अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईचा धडाका ! १.०३ लाख लाभार्थ्यांचे धान्य बंद; पण रेशन दुकानदारच बीपीएल चे लाभार्थी; ‘मिशन सुधार’च्या कारवाईवर सवाल
जळगाव प्रतिनिधी : सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘मिशन सुधार अभियान’अंतर्गत जिल्ह्यात तब्बल १ लाख ७२ हजार संशयास्पद लाभार्थ्यांची तपासणी सुरू आहे. त्यापैकी १ लाख ३ हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्यात आले असून, आणखी ६९ हजार लाभार्थी तपासणीच्या रडारवर आहेत.
मात्र, या कारवाईमुळे एक बोचरा सवाल पुढे आला आहे,ज्या रेशन दुकानदारांच्या माध्यमातून शासनाचे धान्य वितरित होते, त्यांच्यापैकी काही रेशन दुकानदारच बीपीएल कार्डधारक असतील तर त्यांच्या पात्रतेची तपासणी कोण करणार?
सामान्य लाभार्थ्यांच्या आधार-ई-केवायसीतील तफावत, नावातील किरकोळ चुका किंवा तांत्रिक अडचणींमुळे रेशन बंद होत असल्याच्या तक्रारी आहेत. दुसरीकडे रेशन दुकानाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाची उत्पन्न, मालमत्ता आणि इतर पात्रता निकषांनुसार तपासणी झाली आहे का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
मृत व्यक्तींच्या नावावर धान्य उचलणे, दुबार नावे, संशयास्पद आधार, उत्पन्न मर्यादा, चारचाकी वाहन, पाच एकरांपेक्षा अधिक बागायती जमीन, आयकर भरणे, सरकारी नोकरी किंवा व्यावसायिक मालमत्ता अशा निकषांवर अपात्र लाभार्थी शोधले जात आहेत. मग हेच निकष रेशन दुकानदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना लागू केले आहेत का?
जर रेशन दुकानदार बीपीएल लाभार्थी म्हणून पात्र ठरले असतील, तर त्यांची पात्रता नेमकी कोणत्या निकषांवर निश्चित झाली, याचा खुलासा पुरवठा विभागाने करणे गरजेचे आहे. सध्या तपासणी दरम्यान काही रेशन दुकानदारांची नावे आढळले आहे, अजून जास्तीचे नावे असल्याची शक्यता आहे.
‘मिशन सुधार’चा उद्देश गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत धान्य पोहोचवणे असेल, तर कारवाईत कोणताही दुजाभाव नको. सामान्यांच्या रेशन कार्डावर कारवाईचा हातोडा आणि रेशन व्यवस्थेशी संबंधितांच्या कार्डांकडे दुर्लक्ष—असा संशय निर्माण होणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाची आहे.
त्यामुळे रेशन दुकानदारांच्या बीपीएल कार्डांची स्वतंत्र तपासणी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा प्रश्न कायम राहणार—‘मिशन सुधार’ खरंच अपात्र लाभार्थ्यांविरुद्ध आहे, की फक्त सामान्यांच्या ताटावरच त्याची नजर आहे?
यात सर्व रेशन दुकानदारांची नावे bpl कार्ड बारा अंकी नंबर तसेच रेशन दुकान क्रमांक सोबतच प्रकाशित करण्यात येणार….?
