“हुक्म देने वाले बहुत मिलेंगे इस शहर में,
असर उसी का होता है, जो खड़ा हो जनता के पहर में…”
जनता लाईव्ह :- शहराचा कारभार केवळ कार्यालयात बसून आदेश देऊन चालत नाही; त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून परिस्थिती समजून घेण्याची आणि समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असते. जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जीवने यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी गोलाणी मार्केटमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून याच कार्यपद्धतीचा प्रत्यय दिला.
शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीरपणे घेत आयुक्त जीवने यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकासह गोलाणी मार्केट परिसराची पाहणी केली. केवळ सूचना देण्यावर न थांबता त्यांनी प्रत्यक्ष स्वच्छता कामाचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना देत सफाईचे काम करून घेतले. त्यामुळे प्रशासनाचा प्रमुख अधिकारी नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरतो, हा सकारात्मक संदेश शहरात गेला आहे.
विशेष म्हणजे रविवारची सुट्टी असतानाही आयुक्तांनी शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य दिल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त होत आहे. अधिकारी कार्यालयात बसून आदेश देण्यापेक्षा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी करतो, तेव्हा प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होतो. आयुक्त जीवने यांच्या या कृतीकडे त्याच दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे.
गोलाणी मार्केटची स्वच्छता ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मात्र, या निमित्ताने शहरातील इतर बाजारपेठांचाही प्रश्न ऐरणीवर येतो. फुले मार्केटसह शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्येही आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांचा आढावा घ्यावा, अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
गोलाणी मार्केटमध्ये स्वच्छतेबरोबरच पार्किंगचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना वाहन उभे करण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने वाहतूक कोंडी आणि व्यापाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्वच्छतेसोबतच पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेवरही ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
आयुक्त जीवने यांच्या कामकाजाची आणखी एक वेगळी बाजू म्हणजे संवादाची शैली. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत त्यांनी विषय मांडताना शेरो-शायरीचा आधार घेत सभागृहातील वातावरण हलकेफुलके ठेवले होते. प्रशासनातील गांभीर्य कायम ठेवत संवादाची सहज शैली जपण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच वेगळा ठरतो.
शहराला आज केवळ घोषणा करणारे अधिकारी नकोत, तर घोषणांच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष कृती करणारे अधिकारी आवश्यक आहेत. आयुक्त जीवने यांनी सुट्टीच्या दिवशी गोलाणी मार्केटमध्ये उतरून स्वच्छतेची पाहणी करण्याचा घेतलेला पुढाकार त्यामुळे कौतुकास्पद ठरतो.
मात्र, एका दिवसाच्या पाहणीपुरते हे अभियान मर्यादित न राहता त्याचे सातत्यपूर्ण कृतीत रूपांतर होणे महत्त्वाचे आहे. गोलाणी मार्केटपासून सुरू झालेला हा स्वच्छतेचा आणि प्रत्यक्ष पाहणीचा धागा फुले मार्केटसह शहरातील प्रत्येक बाजारपेठेपर्यंत पोहोचला, तर जळगावच्या स्वच्छतेच्या चित्रात निश्चितच सकारात्मक बदल घडू शकतो.
कारण शहर बदलण्यासाठी केवळ हुकूम पुरेसा नसतो; नेतृत्वाने स्वतः मैदानात उतरावे लागते. आणि आयुक्त आदित्य जीवने यांनी रविवारी मैदानात उतरून त्याची एक झलक दाखवून दिली आहे.
