लायसन्स, पॅनकार्ड, आर.सी. बुक, लर्निंग लायसन्ससह महत्त्वाची कागदपत्रे कचऱ्यात; नागरिकांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेचे काय?
जळगाव, दि. 13 ऑगस्ट 2026 : ज्या शासकीय कार्यालयावर नागरिकांच्या वाहनविषयक कागदपत्रांची सुरक्षितता आणि नोंदींचे जतन करण्याची जबाबदारी आहे, त्याच जळगाव RTO कार्यालयाच्या आवारात जनतेची महत्त्वाची कागदपत्रे चक्क उकिरड्यावर आढळून येणे ही केवळ निष्काळजीपणाची बाब नाही, तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना आहे.
जनता लाईव्हच्या प्रतिनिधींनी आज, 13 ऑगस्ट 2026 रोजी, RTO कार्यालयाच्या आवारात पाहणी केली असता ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, आर.सी. बुक, लर्निंग लायसन्स तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे कचऱ्यात आणि अस्ताव्यस्त अवस्थेत आढळून आली. नागरिकांच्या ओळखीशी आणि वैयक्तिक माहितीशी थेट संबंधित असलेली कागदपत्रे अशा प्रकारे उघड्यावर पडलेली असणे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्न उपस्थित करते.
कागदपत्रे कचऱ्यात कशी पोहोचली? या घटनेचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, ही कागदपत्रे RTO कार्यालयाच्या आवारातील उकिरड्यावर आली तरी कशी? ही कागदपत्रे कार्यालयीन प्रक्रियेतून बाद करण्यात आली होती का? असल्यास त्यांची विल्हेवाट लावण्याची कोणती प्रक्रिया राबविण्यात आली? संबंधित कागदपत्रांमधील वैयक्तिक माहिती नष्ट करण्याची कोणतीही खबरदारी घेण्यात आली होती का? की कार्यालयीन कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली महत्त्वाची कागदपत्रे सरळ कचऱ्यात टाकण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे RTO प्रशासनाने जनतेसमोर देणे आवश्यक आहे.
नागरिकांच्या गोपनीयतेशी खेळ तर नाही ना? आजच्या डिजिटल युगात एखाद्या व्यक्तीचे लायसन्स, पॅनकार्ड, आर.सी. बुक किंवा इतर ओळखपत्र हे केवळ कागदाचे तुकडे नसतात. त्यामध्ये नागरिकाची ओळख, वाहनाची माहिती आणि इतर संवेदनशील तपशील असू शकतात.
अशी कागदपत्रे उघड्यावर किंवा कचऱ्यात सापडणे म्हणजे संबंधित माहिती अनोळखी व्यक्तींच्या हातात जाण्याची शक्यता निर्माण होणे होय. त्यातून गैरवापराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही बाब केवळ स्वच्छतेशी संबंधित नसून नागरिकांच्या माहितीच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रशासकीय प्रश्न आहे.
जबाबदारी निश्चित होणार का? शासकीय कार्यालयात एखादी फाईल चुकीच्या ठिकाणी गेली तरी त्याची नोंद, जबाबदारी आणि चौकशी केली जाते. मग नागरिकांच्या नावावर असलेली महत्त्वाची कागदपत्रे कचऱ्यात आढळल्यानंतर याची जबाबदारी कोणाची?
कागदपत्रे हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची? संबंधित विभागप्रमुखांची? कचरा व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेची? की संपूर्ण प्रशासकीय देखरेखीची? जबाबदारी निश्चित न करता हा प्रकार केवळ ‘चूक’ म्हणून दुर्लक्षित केला तर भविष्यात अशाच घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
RTO प्रशासनाने खुलासा करणे गरजेचे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कचऱ्यात सापडलेली कागदपत्रे कोणत्या प्रक्रियेतून तेथे पोहोचली, याचा शोध घेणे आवश्यक आहे. संबंधित कागदपत्रांमध्ये नागरिकांची वैयक्तिक माहिती असल्यास ती सुरक्षित करण्यात आली आहे का, याचीही खातरजमा होणे गरजेचे आहे.
तसेच अशा प्रकारची कागदपत्रे नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कार्यालयात कोणती नियमावली आहे आणि तिचे पालन झाले का, याची माहिती प्रशासनाने सार्वजनिक करावी. जनतेकडून कागदपत्रे मागताना ‘शासकीय प्रक्रिया’ सांगणाऱ्या यंत्रणेने त्याच जनतेची कागदपत्रे उकिरड्यावर पडू देणे, हा विरोधाभास प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.
आता प्रश्न फक्त कागदपत्रांचा नाही; प्रश्न आहे जनतेच्या विश्वासाचा! RTO कार्यालय हे नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे शासकीय केंद्र आहे. त्यामुळे तेथे येणाऱ्या प्रत्येक कागदपत्राची सुरक्षितता ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. उकिरड्यावर सापडलेल्या या कागदपत्रांनी त्या जबाबदारीच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोष निश्चित करावा, संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी आणि भविष्यात नागरिकांची संवेदनशील कागदपत्रे अशा प्रकारे उघड्यावर पडणार नाहीत, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.
अन्यथा, “जनतेची कागदपत्रे सुरक्षित आहेत” असा दावा करणाऱ्या प्रशासनावर जनतेने विश्वास तरी कसा ठेवायचा?
