करार संपला तरी आरटीओच्या लर्निंग लायसन्स परीक्षा हॉलमध्ये तसेच इतर ठिकाणी ‘कर्मचाऱ्य’ ची सेवा सुरूच!
७ हजारांच्या लाचप्रकरणानंतर आरटीओतील खासगी पंटरांच्या वावरावर प्रश्नचिन्ह; करार संपलेल्या व्यक्तीला कार्यमुक्त का केले नाही?
जळगाव प्रतिनिधी : जळगाव आरटीओ कार्यालयातील कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कायमस्वरूपी कार पासिंगसाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी एका खासगी एजंटला एसीबीने अटक केली होती. या कारवाईनंतर आरटीओ कार्यालयातील एजंट, खासगी व्यक्ती आणि अधिकृत कर्मचारी यांच्यातील सीमारेषा नेमकी कुठे आहे, हा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता लर्निंग लायसन्स परीक्षा हॉलमधील तसेच इतर ठिकाणी‘कर्मचाऱ्यांच्या’ उपस्थितीचा प्रकार समोर आला आहे.
आमच्या प्रतिनिधींनी आरटीओ कार्यालयाला भेट दिली असता, लर्निंग लायसन्स परीक्षा हॉलमध्ये एक पंटर काम करताना दिसून आला. सूत्रांच्या माहितीनुसार, या कार्यालयात काही कर्मचाऱ्यांची यापूर्वी मुख्यमंत्री कौशल्य विकास उपक्रमांतर्गत नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांचा करार एप्रिल महिन्यातच संपल्याचे सांगितले जाते. असे असतानाही ऑगस्ट महिन्यातही संबंधित व्यक्ती परीक्षा हॉलमध्ये कार्यरत असल्याचे दिसून आल्याने, करार संपल्यानंतरही त्यांना कोणत्या अधिकाराने काम करू दिले जात आहे? आणि त्यांना कार्यमुक्त का करण्यात आले नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रत्येक टेबलामागे एक पंटर? यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, आरटीओ कार्यालयातील जवळपास प्रत्येक टेबलावर अधिकृत कर्मचाऱ्यासोबत एक पंटर कामाला असल्याची चर्चा सूत्रांमध्ये रंगली आहे. हे पंटर नेमके कोण आहेत, त्यांची नियुक्ती कोणी केली, त्यांना कार्यालयात बसण्याची परवानगी कोणाच्या आदेशाने देण्यात आली आणि ते नेमके कोणते काम करतात, याबाबत आता नागरिकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.
आरटीओ कार्यालयात वाहन परवाना, लर्निंग लायसन्स, कायमस्वरूपी लायसन्स, वाहन पासिंग, नोंदणी यांसारख्या कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येतात. अशा परिस्थितीत अधिकृत कर्मचारी कोण, करारावरील कर्मचारी कोण आणि पंटर किंवा एजंट कोण, हेच नागरिकांना स्पष्ट होत नसेल तर कार्यालयीन कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे, लाचप्रकरणातील एसीबीच्या कारवाईनंतरही जर पंटरांचा मुक्त वावर सुरू असेल, तर प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
पंटर कोणाच्या इशाऱ्यावर काम करतात?
कार्यालयात पंटर बसविण्यामागे नेमका उद्देश काय? ते नागरिकांची कामे करून देतात की एजंट म्हणून काम करतात? त्यांना कोणत्या अधिकाऱ्याचे संरक्षण आहे? आणि कोणता पंटर तर हा कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यासाठी काम करतो? कार्यालयीन कामकाजातील माहिती अथवा कागदपत्रांपर्यंत त्यांना कितपत प्रवेश आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
विशेष म्हणजे, करार संपलेल्या व्यक्तीला आजपर्यंत कार्यमुक्त न करण्यामागे काही आर्थिक हितसंबंध आहेत का? तसेच इतर पंटरांना कार्यालयात काम करण्याची मुभा देण्यामागे कोणाचा हात आहे, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. केवळ ‘तो आमचा कर्मचारी नाही’ असे सांगून प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही; कारण तो व्यक्ती कार्यालयातील संवेदनशील विभागात प्रत्यक्ष काम करताना आढळत असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.
आरटीओ प्रशासन खुलासा करणार का?
लाचप्रकरणानंतर आरटीओ कार्यालयातील खासगी व्यक्तींच्या वावराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे कार्यालयात कार्यरत असलेल्या प्रत्येक पंटरची ओळख, त्याला कार्यालयात प्रवेशाची परवानगी कोणी दिली, तो कोणते काम करतो आणि त्याला कोणत्या अधिकाऱ्याचे पाठबळ आहे, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
7000 चा लाच प्रकरणानंतर सुद्धा आरटीओ कार्यालयात खाजगी पंटर च्या वापरावा प्रश्नचिन्ह,पाण्यात राहून मगरीशी वैर करता येत नाही, याचा अर्थ अधिकाऱ्याच्या परवानगी नेच असे प्रकार चालत असावे.
लर्निंग लायसन्स परीक्षा हॉलमध्ये करार संपल्यानंतरही कार्यरत असलेला पंटर कोण? त्याला कोणाच्या आदेशाने काम करण्याची परवानगी मिळाली? तसेच आरटीओच्या प्रत्येक टेबलामागे पंटर असल्याची चर्चा कितपत खरी आहे? याचा सविस्तर खुलासा लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे जळगाव आरटीओ प्रशासन या गंभीर प्रश्नांवर काय भूमिका घेते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
