उन्हाच्या झळांनी हैराण मुक्या जीवांचा आक्रोश; शहरातील वृक्षतोडीमुळे प्राण्यांवर संकट
जनता लाईव्ह:- ४५ ते ४६ अंश तापमानात माणसांकडे पर्याय; पण मुक्या प्राण्यांना सावलीचाच आधार नाही
जळगाव जिल्ह्यात सध्या तापमानाने अक्षरशः कहर केला असून ४५ ते ४६ अंशांपर्यंत पारा पोहोचत आहे. या तीव्र उन्हामुळे नागरिक दुपारच्या वेळेत अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडत आहेत. अनेकजण घरात पंखा, कुलर, एसी यांचा आधार घेत आहेत, तर बाहेर पडल्यास झाडांच्या सावलीत थोडा विसावा घेत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या सगळ्या सुविधांपासून मुक्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना पूर्णपणे वंचित राहावे लागत आहे.

अशीच एक हृदयद्रावक घटना आज जळगाव शहरात पाहायला मिळाली. तीव्र उन्हापासून बचाव करण्यासाठी एक कुत्रा चक्क पंचर काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीत बसलेला दिसला. त्या कुत्र्याच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता आणि चिंतेची भावना पाहून अनेकांच्या मनाला चटका लागला. जणू काही तो मुक्या भाषेत एकच प्रश्न विचारत होता — “माणसांनी जंगल तोडले, शहरातील झाडेही संपवली; आता आम्ही जगायचे तरी कुठे?”
आज माणसांकडे उष्णतेपासून वाचण्यासाठी अनेक साधने आहेत, पण मुक्या प्राण्यांकडे फक्त झाडांची सावली आणि पाण्याचा आधार असतो. तोही जर हिरावला गेला, तर या जीवांनी जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून आता शहरातील वृक्षतोड थांबवण्याची आणि अधिकाधिक झाडे लावण्याची मागणी होत आहे. अन्यथा वाढत्या तापमानासोबत मुक्या प्राण्यांचा जीव जाण्याच्या घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

