प्रामाणिकपणाचे दर्शन! बीव्हीजीच्या कर्मचाऱ्यांनी कचऱ्यातून शोधून परत केले सात ग्रॅम सोन्याचे दागिने..
जळगाव : अनेकदा विविध कारणांनी चर्चेत राहणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हरवलेले सुमारे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने शोधून ते सुरक्षितपणे मालकाला परत केल्याने या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीव्हीजी कंपनीचे चालक अविनाश रवींद्र चौधरी आणि हेल्पर सुरेश संजय जाधव हे नेहमीप्रमाणे जळगाव शहरातील वार्ड क्रमांक १९, रामेश्वर कॉलनी परिसरात घरगुती कचरा संकलनाचे काम करत होते. त्याचवेळी परिसरातील रहिवासी शिवाजी बाबुराव वंजारी यांच्या घरातील सुमारे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने नजरचुकीने कचऱ्यासोबत गाडीत टाकले गेले.
संपूर्ण वार्डातील कचरा संकलन पूर्ण झाल्यानंतर आणि वाहन पूर्णपणे भरल्यानंतर ते कचरा कॉम्पॅक्टरमध्ये रिकामा करण्यासाठी जात असतानाच शिवाजी वंजारी यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.
घटनेचे गांभीर्य ओळखून चालक अविनाश चौधरी आणि हेल्पर सुरेश जाधव यांनी कोणताही विलंब न करता नेरे नाका येथील बीव्हीजीच्या झोनमध्ये वाहन नेले. त्यानंतर संपूर्ण कचरा खाली करून प्रत्येक कॅरीबॅग काळजीपूर्वक उघडून तपासण्यात आली. बराच वेळ अथक शोध घेतल्यानंतर अखेर कचऱ्यातून सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने सुरक्षितपणे मिळाले.
यानंतर या घटनेची माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक कुणाल बारसे सुपरवायझर नीरज पाटील आणि व्यवस्थापक विनोद रेड्डी यांना यांना तात्काळ देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सोन्याचे दागिने टीबीएस हॉस्पिटल परिसरातील बीव्हीजीच्या मुख्य कार्यालयात आणून आवश्यक खात्री करून संबंधित मालक शिवाजी बाबुराव वंजारी यांच्याकडे प्रामाणिकपणे सुपूर्द करण्यात आले.
हरवलेले मौल्यवान दागिने सुखरूप परत मिळाल्याने शिवाजी वंजारी यांनी चालक अविनाश चौधरी आणि हेल्पर सुरेश जाधव यांचे मनापासून आभार मानले. तसेच व्यवस्थापक विनोद रेड्डी यांच्या उपस्थितीत या दोन्ही कर्मचाऱ्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. त्यांना भेटवस्तू व आर्थिक प्रोत्साहन देऊन त्यांच्या प्रामाणिकपणाचा गौरव करण्यात आला.
या घटनेमुळे रामेश्वर कॉलनी परिसरात बीव्हीजीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि सेवाभावाची चर्चा रंगली असून, “प्रामाणिकपणा अजूनही जिवंत आहे,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
