बैठका, पाहण्या आणि दावे… तरीही जळगावच्या स्वच्छतेचे वास्तव विदारक!
जळगाव : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सातत्याने बैठका घेतल्या जातात. महापौर, आरोग्य विभागाचे उपायुक्त तसेच आयुक्त स्वतः विविध भागांची पाहणी करतात. स्वच्छतेबाबत मोठमोठे दावे केले जातात. मात्र, प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांत अस्वच्छतेचे साम्राज्य कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे बैठका आणि पाहण्या प्रत्यक्ष कामात कितपत उतरतात, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गाडगेबाबा चौकापासून हाकेच्या अंतरावर पठाणशाह बाबा दर्ग्याजवळील परिसर. या ठिकाणी दिवसेंदिवस कचऱ्याचा ढिग वाढत असून तो हटविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. केवळ घरगुती कचरा नव्हे, तर विविध कार्यक्रमांनंतर उरलेले अन्न, खरकटे पदार्थ आणि इतर ओला कचरा येथे सर्रास टाकला जात आहे. परिणामी संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरत असून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाक दाबून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.
यापुढे नागेश्वर कॉलनी परिसरात मोकळ्या जागेवर टाकलेल्या कचऱ्यात कुत्रे आणि गायी अन्न शोधताना दिसत आहेत. ही परिस्थिती केवळ अस्वच्छतेचेच नव्हे, तर शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या अपयशाचे द्योतक आहे. अशा प्रकारे विखुरलेला कचरा सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतो.
शहर स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या बीव्हीजी कंपनीच्या कामकाजावरही यामुळे पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वच्छतेबाबत मोठमोठे दावे करणाऱ्या कंपनीने प्रत्यक्षात शहरातील संवेदनशील भागांमध्ये नियमित आणि प्रभावी साफसफाई करणे अपेक्षित आहे. इतर शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये ज्या कार्यक्षमतेने काम केल्याचा दावा केला जातो, तीच कार्यक्षमता जळगावमध्ये का दिसत नाही, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
केवळ बैठका, आढावा आणि पाहण्या करून शहर स्वच्छ होत नाही. त्यासाठी जबाबदार यंत्रणेने सातत्यपूर्ण काम, प्रभावी नियोजन आणि कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. कचरा वेळेवर उचलला जातो का, संवेदनशील ठिकाणांवर नियमित स्वच्छता होते का, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
जळगाव शहराला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनविण्याचे स्वप्न केवळ घोषणांमध्ये न राहता प्रत्यक्षात उतरावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. महानगरपालिका प्रशासन आणि बीव्हीजी कंपनीने परस्परांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी तातडीने या भागांची स्वच्छता करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. अन्यथा “स्वच्छ शहर” ही संकल्पना फक्त कागदावरच राहील आणि नागरिकांना अस्वच्छता, दुर्गंधी व आरोग्याच्या धोक्यांना रोज सामोरे जावे लागेल.

