महापौर दीपमाला काळे यांची नागरी समस्यांवर थेट पाहणी; निष्काळजी अधिकाऱ्यांना फटकारले अयोध्या नगरात नागरिकांनी मांडल्या समस्या; तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी गुरुवारी अयोध्या नगर व ऑटो नगर परिसराचा दौरा करून नागरिकांच्या नागरी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी गटार तुंबणे, सांडपाण्याचा निचरा न होणे, रस्त्यांच्या कामातील विलंब अशा विविध प्रश्नांबाबत नागरिकांनी त्यांच्यासमोर व्यथा मांडली. समस्या ऐकल्यानंतर महापौरांनी संबंधित विभागांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
अयोध्या नगरातील अशोक नगर परिसरातील गणपती मंदिराजवळ सांडपाण्याच्या निचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर महापौर काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानिक रहिवाशांनी गटारींच्या दुरवस्थेमुळे निर्माण झालेल्या अडचणींची माहिती दिली.
पालिका अधिकारी योगेश वाणी यांनी सद्यस्थिती व तांत्रिक बाबींबाबत माहिती देत उपाययोजनांचा आराखडा सादर केला. त्यानंतर महापौरांनी पुढील आठवड्यापर्यंत नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरणार नाही, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या पाहणीवेळी नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके, प्रदीप रोटे, रंजना वानखेडे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऑटो नगरमध्ये रस्त्यांच्या कामावरून अधिकाऱ्यांना जाब यानंतर महापौरांनी ऑटो नगर परिसराची पाहणी केली. येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामातील विलंब आणि नियोजनाच्या अभावाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत कामकाजातील त्रुटींवर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“कामांचे योग्य नियोजन का होत नाही? विविध विभागांमध्ये आवश्यक समन्वय का नाही?” असा सवाल करत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील समन्वयाच्या अभावावर बोट ठेवले.
आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेबाबत नागरिक संतप्त दौऱ्यादरम्यान काही महिला नागरिकांनी आपल्या घरांसमोरील तुंबलेल्या गटारींची स्थिती महापौरांना प्रत्यक्ष दाखवून दिली. आरोग्य विभागाकडून वेळेवर साफसफाई होत नसल्याची तक्रार करत नागरिकांनी संताप व्यक्त केला. नागरिकांच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष परिस्थिती पाहून महापौर दीपमाला काळे यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.
गटारींची तात्काळ साफसफाई करून नागरिकांना दिलासा देण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महापौरांच्या या धावत्या दौऱ्यामुळे अनेक प्रलंबित नागरी प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

