ठेवीदारांच्या पैशांचा हिशोब कोण देणार?
जनता लाईव्ह :- आसोदा पतसंस्थेतील कथित गैरव्यवहारावर आता कठोर चौकशीची गरज
जळगाव तालुक्यातील आसोदा ग्रामीण सहकारी मर्यादित पतसंस्था, आसोदा येथे झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे शेकडो ठेवीदारांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाले असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. अनेक गोरगरीब नागरिकांनी आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित राहावी या विश्वासाने पतसंस्थेत ठेव स्वरूपात जमा केली होती. मात्र आज त्या ठेवीदारांना स्वतःच्या पैशासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात निवेदन देत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 88 अंतर्गत चौकशीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे 15 दिवसांत चौकशी सुरू न झाल्यास उपनिबंधक कार्यालयाला टाळे ठोकून शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे हा विषय आता केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरता मर्यादित न राहता राजकीय आणि सामाजिक पातळीवरही गंभीर बनत चालला आहे.
सदर पतसंस्था आज मूळ ठिकाणी अस्तित्वात नसून त्या ठिकाणी किराणा दुकान सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महत्वाची कागदपत्रे गायब झाल्याची शक्यता व्यक्त होत असून, व्यवस्थापक आणि संचालक मंडळाशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे. जर हे आरोप खरे असतील तर ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. कारण सहकार क्षेत्रावर ग्रामीण भागातील नागरिकांचा असलेला विश्वास अशा घटनांमुळे डळमळीत होतो.
यापूर्वीही अनेक पतसंस्थांमधील घोटाळ्यांमुळे हजारो कुटुंबे आर्थिक संकटात सापडल्याची उदाहरणे राज्यभरात पाहायला मिळाली आहेत. मात्र प्रत्येक वेळी चौकशी, आश्वासने आणि कागदोपत्री कारवाई यापलीकडे फारसे काही घडताना दिसत नाही. त्यामुळे आता प्रशासनाने या प्रकरणात केवळ निवेदन स्वीकारण्यापुरती भूमिका न घेता तातडीने स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी सुरू करणे गरजेचे आहे.
ठेवीदारांचा पैसा हा कोणाच्याही मनमानीचा विषय असू शकत नाही. जर पतसंस्थेच्या संचालक मंडळाने, व्यवस्थापकांनी किंवा संबंधितांनी गैरव्यवहार केला असेल, तर त्यांची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना न्याय मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा सहकार क्षेत्रातील विश्वास उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही.
या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि ठेवीदारांना दिलासा द्यावा, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
या प्रसंगी सचिन चौधरी शिवसेना (उबाठा) गट उपतालुकाप्रमुख. गुलाबरावजी कांबळे उपजिल्हाप्रमुख मागासवर्गीय सेना. योगेश चौधरी उपजिल्हा संघटक. विकास पाटील शिवसैनिक -राकेश घुगे सोशल मीडिया तालुकाप्रमुख किरण ठाकूर मिलिंद नारखेडे खेमचंद चौधरी विलासराव बारी दीपक पाटील व इतर पदाधिकारी व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते

