‘प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव, वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार!
उज्ज्वल निकम यांचीही उपस्थिती; छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून संभाजी नाट्यगृहापर्यंत मोटारसायकल रॅली
जळगाव, दि. ११ ऑक्टोबर : राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता राजकुमार राव, अभिनेत्री वामिका गब्बी आणि खासदार उज्ज्वल निकम आज, रविवार, ११ ऑक्टोबर रोजी जळगावला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जळगावकर चित्रपटप्रेमींना या कलाकारांशी संवाद साधण्याची विशेष संधी मिळणार आहे.
सायंकाळी ४.४५ वाजता मोटारसायकल रॅली
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सायंकाळी ४.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून छत्रपती संभाजी नाट्यगृहापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शहरात ‘प्रहार’ चित्रपटाच्या आगमनाची उत्सुकता वाढली आहे.
उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रपट
‘प्रहार’ चित्रपटात अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. खासदार उज्ज्वल निकम यांच्या जीवनातील विविध पैलू, त्यांचा संघर्षमय प्रवास आणि न्यायव्यवस्थेतील योगदान यांवर आधारित या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटाविषयी राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी जळगावकरांना मिळणार आहे.
अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन
या विशेष कार्यक्रमाचे आयोजन ‘खासदार उज्ज्वल निकम कार्यक्रम मित्र परिवार समिती’च्या वतीने करण्यात आले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे समितीचे अध्यक्ष आहेत.
समितीच्या प्रमुख सदस्यांमध्ये नंदकुमार बेंडाळे, भरत अमळकर, अनिश शहा, अनिल कांकरिया, युसुफ मकरा, डॉ. रेखा महाजन, डॉ. राजेश पाटील, किरण बच्छाव, प्रकाश पाटील, अमर कुकरेजा, ॲड. भरत देशमुख, रोहित निकम, जितेंद्र लाठी, प्रसाद सूर्यवंशी, राहुल पवार, प्रतीक्षा सोनवणे, विराज कावडिया आणि हर्षल पाटील यांचा समावेश आहे.
जळगावकरांना उपस्थित राहण्याचे आवाह
हा विशेष कार्यक्रम जळगावकरांसाठी खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले.
