चार दिवस उलटले, तरी हॉटेल रॉयल पॅलेसच्या एलईडी जाहिरातीवर कारवाई नाही; मनपाच्या कारवाईत दुहेरी निकष?
भंगाळे गोल्ड, अंबुजा सिमेंट, आर. एल. ज्वेलर्सवर तातडीची कारवाई; मात्र हॉटेल रॉयल पॅलेसची एलईडी जाहिरात प्रशासनाच्या नाकावर सुरूच
जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरातील चौक व दुभाजकांच्या सुशोभीकरणाच्या कामांमध्ये नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने जळगाव महानगरपालिकेने २४ जुलै २०२६ रोजी नियमभंग करणाऱ्या ११ संस्था व कंपन्यांना नोटिसा बजावल्या होत्या. संबंधितांना दोन दिवसांच्या आत अनधिकृत जाहिराती व नामफलक स्वतःहून हटविण्याचे आदेश देण्यात आले होते. आदेशाचे पालन न केल्यास अतिक्रमण विभागामार्फत थेट कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता.
यानंतर मनपाच्या अतिक्रमण विभागाने पहिल्या टप्प्यात कारवाई करत भंगाळे गोल्ड, अंबुजा सिमेंट आणि आर. एल. ज्वेलर्स यांच्या चौक व दुभाजकांवरील अनधिकृत जाहिराती व फलक हटविले. या कारवाईमुळे महानगरपालिका नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले.
मात्र, याच नोटिशीत समाविष्ट असलेल्या हॉटेल रॉयल पॅलेसच्या एलईडी जाहिरातीवर चार दिवस उलटूनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे दिसून येत आहे. संबंधित एलईडी जाहिरात अद्यापही सुरू असल्याने मनपाच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महानगरपालिकेच्या आदेशानुसार सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून अंतिम ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळाल्यानंतरच संबंधित संस्था किंवा कंपनीला स्वतःचे ब्रँडिंग, जाहिरात किंवा एलईडी फलक लावण्याची परवानगी आहे. त्यामुळे नोटीस बजावूनही एलईडी जाहिरात सुरू राहिल्याने नियमांची अंमलबजावणी सर्वांवर समान पद्धतीने होत आहे का, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.
एका बाजूला काही संस्थांवर तातडीने कारवाई करण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला हॉटेल रॉयल पॅलेसच्या एलईडी जाहिरातीवर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या कारवाईत दुहेरी निकष आहेत का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. जर नियम सर्वांसाठी समान असतील, तर नोटीस मिळाल्यानंतरही संबंधित जाहिरात अद्याप कशी सुरू आहे, याचे उत्तर प्रशासनाने देणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
महानगरपालिकेने सुरू केलेल्या या मोहिमेचा उद्देश शहरातील चौक व दुभाजकांचे विद्रूपीकरण रोखणे, सार्वजनिक जागांचे सौंदर्य अबाधित ठेवणे आणि सुशोभीकरणाच्या कामात पारदर्शकता राखणे हा आहे. त्यामुळे नियमांची अंमलबजावणी करताना कोणत्याही संस्था, उद्योगसमूह किंवा प्रतिष्ठानाला वेगळी वागणूक न देता समान निकष लावणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
आता शहरवासीयांचे लक्ष महानगरपालिकेच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे. नोटीस बजावून चार दिवस उलटल्यानंतरही सुरू असलेल्या हॉटेल रॉयल पॅलेसच्या एलईडी जाहिरातीवर मनपा कारवाई करणार का, की ही बाब केवळ नोटिशीपुरतीच मर्यादित राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कोणताही भेदभाव न करता समान कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
