जळगाव महापालिकेत प्रशासकीय फेरबदल; नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार मनोज शर्मा यांच्याकडे
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेतील प्रभारी नगरसचिव सतिष ईश्वरीप्रसाद शुक्ला हे दि. ३१ जुलै २०२६ रोजी विहित वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने महापालिका प्रशासनाने नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या आदेशानुसार मनोज रामचंद्र शर्मा, लिपीक तथा प्रभारी अधीक्षक, प्रभाग समिती क्र. १ तसेच प्रभारी अधीक्षक, घरकुल व किरकोळ वसुली विभाग, यांच्याकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आला आहे. श्री. शर्मा हे स्वतःचे मूळ पदावरील कामकाज सांभाळून नगरसचिव पदाची जबाबदारीही पार पाडणार आहेत.
तसेच, सेवानिवृत्त होणारे सतिष ईश्वरीप्रसाद शुक्ला यांनी त्यांच्या ताब्यातील सर्व प्रशासकीय कामकाज, कागदपत्रे, अभिलेख व इतर दप्तरे यांचा कार्यभार लेखी स्वरूपात मनोज शर्मा यांच्याकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या प्रशासकीय बदलामुळे नगरसचिव कार्यालयातील कामकाज अखंडितपणे सुरू राहण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या सेवांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
