नगरोत्थान भुयारी गटार योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मनसेची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा
जळगाव | प्रतिनिधी जळगाव शहरात नगरोत्थान भुयारी गटार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे अनेक भागांतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात हे रस्ते चिखलमय बनल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खराब रस्त्यांमुळे वारंवार अपघात घडत असून नागरिकांना शारीरिक दुखापतींसह कायमस्वरूपी अपंगत्वाचा धोका निर्माण झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रशासनाकडे तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे.
यासंदर्भात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाला निवेदन सादर करून नगरोत्थान भुयारी गटार योजनेमुळे उखडलेले व खराब झालेल्या सर्व रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर या समस्येचा मोठा परिणाम होत असून, विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांवर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मनसेच्या म्हणण्यानुसार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रोजंदारीवर काम करणारे नागरिक हे सर्वाधिक त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी दुचाकी घसरून अपघात होत आहेत, तर पायी चालणाऱ्यांनाही चिखल आणि निसरड्या रस्त्यांमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास गंभीर अपघात होण्याची आणि नागरिकांचे जीवित धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मनसेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
निवेदनात प्रशासनाला इशारा देताना मनसेने स्पष्ट केले आहे की, भुयारी गटार योजनेची कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने युद्धपातळीवर रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, प्रशासनाने त्वरित सकारात्मक भूमिका घेतली नाही आणि रस्त्यांची दुरुस्ती केली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही मनसेने स्पष्ट केले.
हे निवेदन देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, शहराध्यक्ष जितेंद्र बराटे, देवेंद्र भंगाळे, गोपाळ भारुडे, शुभम भावसार, रोहन महाजन, रहीम शेख तसेच परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

