जनता लाईव्ह:– जळगाव शहराला दरवर्षी पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. भूजल पातळी सातत्याने खालावत असून वाढती लोकसंख्या, अनियमित पाऊस आणि भूजलाचा वाढता वापर यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत जळगाव महानगरपालिकेने शहरातील १५ महानगरपालिका शाळांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबविण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ एक विकासकाम नसून, भविष्यातील जलसुरक्षेच्या दिशेने टाकलेले दूरदृष्टीचे पाऊल आहे.
महापौर दीपमालाताई काळे, उपमहापौर मनोजभाऊ चौधरी आणि ताई समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन अंतिम करण्यात आले आहे. तज्ज्ञ पथकाने प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन आवश्यक तांत्रिक मोजमापे पूर्ण केली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे हा प्रकल्प केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने साठा करून ते जमिनीत मुरविण्याची व्यवस्था केल्यास भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होते. याचा थेट लाभ भविष्यातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प शाळांमध्ये राबविला जात असल्याने विद्यार्थ्यांमध्येही जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होईल. शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाची मूल्येही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील.
या कामासाठी अखिल भारतीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे तांत्रिक समन्वयक अमोल काळे, फील्ड कॉर्डिनेटर धीरज आंबिकर, रेखा वाघमारे, शुभम शिरतुरे तसेच ‘प्रॅक्टिकल ॲक्शन’चे मार्गदर्शक अंकित लोकरे यांनी तांत्रिक नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तज्ज्ञांच्या सहभागामुळे प्रकल्पाची गुणवत्ता आणि परिणामकारकता अधिक मजबूत होणार आहे.
आज अनेक शहरे पाण्याच्या प्रश्नाने त्रस्त आहेत. अशा वेळी केवळ नवीन जलस्रोत शोधण्यापेक्षा उपलब्ध पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. जळगाव महानगरपालिकेने याच विचारातून पुढाकार घेतल्याचे या उपक्रमातून दिसून येते. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास भविष्यात शहरातील इतर शाळा, शासकीय कार्यालये, सार्वजनिक इमारती तसेच खासगी संस्थांमध्येही अशाच प्रकारचे प्रकल्प राबविण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती किंवा काँक्रीटची कामे नव्हेत; तर पुढील पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’सारखे उपक्रम पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि दीर्घकालीन फायदे देणारे आहेत.
जळगाव महानगरपालिकेने उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. आता या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी, नियमित देखभाल आणि भविष्यात संपूर्ण शहरभर या संकल्पनेचा विस्तार झाला, तर जळगाव जलसंवर्धनाच्या क्षेत्रात राज्यासाठी आदर्श ठरू शकते.

