जळगावात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा बडगा; कागदपत्रे सादर करण्याचे नोटीसद्वारे आदेश
जळगाव : शहरातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने कारवाईचा वेग वाढविला असून, न.र.यो. क्र. ०२, अ.भु. क्र. १९७ येथील एका बांधकामासंदर्भात संबंधित मालकाला नोटीस बजावण्यात आली आहे.
महानगरपालिकेने दिलेल्या नोटीसीनुसार, संबंधित जागेवर अनधिकृतपणे बांधकाम सुरू असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यासाठी संबंधित मालकास बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा, भोगवटा प्रमाणपत्र, मंजूर अभिन्यास किंवा मोजणी नकाशा तसेच मालकी हक्कासंबंधीची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत आवश्यक खुलाशासह ही कागदपत्रे महानगरपालिकेकडे जमा करावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत खुलासा किंवा आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित व्यक्तीचे म्हणणे नसल्याचे गृहीत धरून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) मधील तरतुदीनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
दरम्यान, शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांवर आळा घालण्यासाठी महानगरपालिका अधिक कठोर भूमिका घेत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार असल्याचे संकेत या नोटिशीमधून मिळत आहेत. त्यामुळे संबंधित मालकांनी आवश्यक कागदपत्रांसह नियमानुसार खुलासा सादर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

