जनता लाईव्ह:– बालमजुरीविरोधात जळगाव पोलिसांची आक्रमक मोहीम; दोन गुन्हे दाखल १२ जून “जागतिक बालमजुरी विरोधी दिन”च्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांनी बालमजुरीविरोधात मोठी आणि आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ औपचारिक नसून प्रत्यक्ष कारवाईसह राबवली जात आहे.
दिनांक ८ जूनपासून जळगाव पोलिसांनी जिल्हाभरात गोपनीय शोध आणि बचाव मोहीम सुरू केली असून, हॉटेल्स, ढाबे, गॅरेज, कारखाने, स्क्रॅप युनिट्स, वीटभट्ट्या, रोडसाईड स्टॉल्स, बांधकाम साईट्स आणि धोकादायक उद्योगांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
बालमजुरी ही केवळ कायद्याचे उल्लंघन नसून बालकांच्या शिक्षण, आरोग्य, विकास आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकारांवर होणारा गंभीर आघात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या मोहिमेत सिव्हिल ड्रेसमधील पथक, महिला अधिकारी, चाईल्ड वेल्फेअर ऑफिसर, महिला पंच आणि मानव तस्करी विरोधी कक्षाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग ठेवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, १४ वर्षांखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात काम देणे हा गंभीर गुन्हा आहे. तर १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये कामावर ठेवण्यास कायद्याने बंदी आहे.
दरम्यान, या मोहिमेचे पहिले मोठे यश जळगाव तालुका पोलिसांना मिळाले आहे. बालमजुरी संदर्भात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या प्रकरणात गुन्हा क्रमांक १७६/२६ अंतर्गत अरबाज अजीज खाटीक याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आरोप असा की, एका बालकाला गॅरेजमध्ये धोकादायक पद्धतीने कामावर ठेवण्यात आले होते.
तर दुसऱ्या प्रकरणात गुन्हा क्रमांक १७७/२६ अंतर्गत भगवान पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातही बालकाला गॅरेजमध्ये धोकादायक काम दिल्याचा आरोप आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये बीएनएस कलम १४६, बाल कामगार प्रतिबंधक कायदा कलम ३ आणि जुवेनाइल जस्टिस अॅक्ट कलम ७९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जळगाव पोलिसांची ही मोहीम केवळ कायदेशीर कारवाईपुरती मर्यादित नसून प्रत्येक बालकाला सुरक्षित, शिक्षणाभिमुख आणि सन्मानपूर्ण बालपण मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे पोलिस प्रशासनाने म्हटले आहे.
“ये दौलत भी ले लो,ये शोहरत भी ले लो,भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बच्चपन का सावन,वो काग़ज़ की कश्ती, वो बारिश का पानी…”
या ओळी आजही समाजाला एक प्रश्न विचारतात — बालपण हिरावून घेण्याचा अधिकार नेमका कोणाला दिला आहे?
बालमजुरीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिस, बाल हेल्पलाईन १०९८ किंवा संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

