एमआयडीसी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त धडक मोहीम
जनता लाईव्ह: शहरातील अजिंठा चौफुली परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी सक्रिय असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुरुवारी मध्यरात्री तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान एम.डी. (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थांसह कार, दुचाकी आणि महागडे मोबाइल असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली होती की, काही तरुण पांढऱ्या रंगाच्या कारमधून शहरात अमली पदार्थांची विक्री करत फिरत आहेत. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञ, पंच आणि वजनकाटा धारकांच्या उपस्थितीत सापळा रचला. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील एका ट्रॅव्हल्स कार्यालयाजवळ संशयित वाहनांवर छापा टाकण्यात आला.
या कारवाईत रईस हारुण देशमुख (रा. एमआयडीसी पोलिस कॉलनी), तौसिफ सैय्यद आरिफ (रा. पिंप्राळा हुडको) आणि कृणाल ऊर्फ लकी रमेश पाटील (रा. देवीदास कॉलनी) या तिघांना पोलिसांनी कारमध्ये बसलेल्या अवस्थेत पकडले. त्यांच्या झडतीदरम्यान १६.११ ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला.
याशिवाय पोलिसांनी चार लाख रुपये किमतीची कार, दोन दुचाकी तसेच तीन महागडे मोबाइल फोन असा मोठा ऐवज जप्त केला आहे. संपूर्ण जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल ६ लाख ५३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी हे अमली पदार्थ शहरातील काही मुख्य पुरवठादारांकडून आणल्याची माहिती दिली आहे. या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी मुख्य तस्करांचा शोध सुरू केला असून, या रॅकेटमागील मोठे नेटवर्क उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहरात वाढत्या ड्रग्ज तस्करीमुळे तरुणाई धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त होत असून, पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
