जळगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या डिजिटल मीडिया विभागाच्या जळगाव महानगर अध्यक्षपदी युवा पत्रकार विक्रम कापडणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार मा. वसंतराव मुंडे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, पत्रकार क्षेत्रात या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत आहे.
सदर नियुक्ती आजच्या दिनांकापासून पुढील ११ महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. या कालावधीत विक्रम कापडणे हे जळगाव महानगरातील डिजिटल मीडिया विभागाचे नेतृत्व करणार असून संघटनेच्या विविध उपक्रमांना अधिक गती देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पत्रकारांच्या समस्या, डिजिटल माध्यमातील पत्रकारांचे प्रश्न तसेच संघटनेच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांनी सक्रिय व प्रभावी भूमिका बजावावी, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
विक्रम कापडणे यांनी शोध पत्रकारितेच्या माध्यमातून जळगाव शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः जळगाव महानगरपालिकेतील जन्म-मृत्यू विभागातील विविध गैरप्रकार आणि नागरिकांच्या समस्यांवर त्यांनी सातत्याने बातम्या प्रसिद्ध करून अनेक प्रकरणांना वाचा फोडली. समाजमाध्यमांच्या माध्यमातून त्यांनी अनेक सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले असून त्यांच्या पत्रकारितेची दखल विविध स्तरांतून घेतली जात आहे.
राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी नियुक्तीपत्राद्वारे विक्रम कापडणे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या नियुक्तीमुळे जळगाव महानगरातील डिजिटल पत्रकारितेला नवी दिशा मिळेल, तसेच पत्रकार संघटनात्मक कार्य अधिक मजबूत होईल, असा विश्वासही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, विक्रम कापडणे यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
