भर पावसात दुचाकीवरून शहराची पाहणी; आयुक्तांचा पुढाकार स्वागतार्ह, आता परिणामही दिसले पाहिजेत
जनता लाईव्ह:- जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजाची आयुक्त आदित्य जिवने (भा. प्र. से.) यांनी केलेली सखोल पाहणी ही केवळ औपचारिक तपासणी नव्हती, तर स्वच्छतेबाबत प्रशासन गंभीर असल्याचा स्पष्ट संदेश देणारी ठरली. विशेष म्हणजे, भर पावसात चारचाकीचा वापर न करता स्वतः दुचाकीवरून शहरातील विविध भागांत फिरत त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करत असल्याचे चित्र नागरिकांनाही पाहायला मिळाले.
पाहणीची सुरुवात टीबी सॅनिटोरियम येथील बीव्हीजी कंपनीच्या वाहनतळापासून करण्यात आली. येथे बंद व कार्यरत वाहनांची माहिती घेण्यात आली, वाहनांच्या देखभालीची चौकशी करण्यात आली तसेच कचरा संकलन केंद्राच्या बांधकामाचीही पाहणी करण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी भर पावसात दुचाकीवरून आदर्श नगर, इच्छादेवी परिसर, डी-मार्ट परिसर, गणेश कॉलनी, एम. जे. कॉलेज परिसर, सुभाष चौक, भिलपुरा चौक, नेरी नाका चौक यांसह विविध भागांमध्ये प्रत्यक्ष फिरून स्वच्छतेच्या कामांची तपासणी केली.
भजे गल्ली परिसरात काही व्यावसायिकांनी दुकानाबाहेर कचरा टाकल्याचे निदर्शनास येताच संबंधितांवर तातडीने दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला.
यानंतर जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील १९ प्रभागांतील १९ आरोग्य निरीक्षक तसेच बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची टीबी सॅनिटोरियम येथील ई-बस डेपो परिसरात परेड घेण्यात आली. स्वच्छता कामे अधिक प्रभावीपणे राबविणे, कामात कसूर न करणे आणि नागरिकांना उत्तम सेवा देणे, याबाबत कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी किंवा कंत्राटदार संस्थेवर प्रशासकीय तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही आयुक्तांनी दिला.
यावेळी शहरातील कार्यरत खाजगी वेईंग ब्रिज तसेच महानगरपालिकेच्या नव्याने सुरू होणाऱ्या घनकचरा प्रकल्पातील नव्या वजन काट्याचीही पाहणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाचे काम अधिक सक्षम, अद्ययावत आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
भर पावसात दुचाकीवरून शहरभर फिरत केलेली पाहणी ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. मात्र जळगावकरांची अपेक्षा केवळ पाहणी किंवा इशाऱ्यांपुरती मर्यादित नाही. शहरातील कचऱ्याचे ढिग कमी झाले, स्वच्छता नियमित झाली, निष्काळजी अधिकारी व कंत्राटदारांवर प्रत्यक्ष कारवाई झाली आणि नागरिकांना स्वच्छ शहराचा अनुभव मिळाला, तरच या पाहणीला खऱ्या अर्थाने यश मिळेल.
प्रशासनाने आता इशाऱ्यांपेक्षा कृतीला अधिक महत्त्व देत स्वच्छतेच्या कामात सातत्य ठेवले, तर जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकाभिमुख बनण्याचा मार्ग अधिक सुलभ होईल. भर पावसात रस्त्यावर उतरलेले आयुक्त हे सकारात्मक चित्र आहे; आता त्याचे रूपांतर शहरातील स्वच्छतेच्या दृश्यमान बदलात होणे, हीच जळगावकरांची अपेक्षा आहे.
