संपादकीय : कर्तव्यापुढे पुरालाही झुकावे लागले! पालघर पोलिसांनी वाचविले १३ आदिवासी नागरिकांचे प्राण
पालघर | प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असताना, अशा संकटाच्या काळात प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या मदतीला धावून जात असल्याची प्रेरणादायी उदाहरणे समोर येत आहेत. पालघर पोलीस ठाण्याच्या पथकाने दाखविलेली तत्परता आणि धाडस हे त्यापैकीच एक उल्लेखनीय उदाहरण ठरले आहे.
दिनांक ६ जुलै २०२६ रोजी पालघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघुळसार परिसरातील खाटाओवळ येथील आदिवासी पाड्यावर तीन कुटुंबे पुराच्या पाण्यात अडकून पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अतिवृष्टीमुळे कमरेपेक्षा जास्त पाणी साचल्याने या कुटुंबांना बाहेर पडणे अशक्य झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार थोरात यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संकेत पगडे तसेच पोलीस कर्मचारी सुभाष महाले, संतोष वारघडे, सुयोग कांबळे, सुमित इंगळे, योगेश छानवाल, महेश केकान, ज्ञानेश्वर कांबळे आणि जाधव यांनी दोन शासकीय वाहनांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
वाहनाने पुढे जाणे शक्य नसल्याने पोलिसांनी सुमारे एक किलोमीटर पायी प्रवास करत पुराच्या पाण्यातून मार्ग काढला आणि अडकलेल्या तिन्ही कुटुंबांतील सर्व सदस्यांना सुरक्षित बाहेर काढले. या बचाव मोहिमेत ५ पुरुष, ६ महिला आणि अवघ्या २ वर्षांच्या बालकासह एकूण १२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
ही घटना केवळ बचावकार्य नसून, पोलीस दलाच्या संवेदनशीलतेची, धाडसाची आणि कर्तव्यनिष्ठेची साक्ष देणारी आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांचा जीव वाचविणे हीच खरी लोकसेवा असल्याचे पालघर पोलिसांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
आज अनेकदा पोलिसांवर टीका होत असते; मात्र अशा घटनांमुळे समाजात पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ होतो. संकटसमयी जीव धोक्यात घालून केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास पात्र असून, या संपूर्ण बचाव पथकाचे मनापासून अभिनंदन करावे लागेल.
पूरस्थितीवर पालघर पोलीस सतत लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
