जनात लाईव्ह:- रस्त्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाला स्पष्ट संदेश; उपमहापौर आणि स्थायी सभापतींची ठाम भूमिका स्वागतार्ह…
जळगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेजच्या कामांमुळे नागरिकांना होत असलेला त्रास आणि रखडलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी बांधकाम विभागाची घेतलेली आढावा बैठक ही केवळ औपचारिक बैठक न ठरता जनहिताला प्राधान्य देणारी ठरली आहे
बैठकीत निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर भूमिका घेत दोषी ठेकेदारांना नोटिसा देण्याचे आणि गरज भासल्यास त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. सार्वजनिक निधीतून होणारी विकासकामे दर्जेदार आणि टिकाऊ असावीत, हा संदेश या निर्णयातून देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात कामांच्या गुणवत्तेत निश्चितच सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ड्रेनेजच्या कामांमुळे उघडे पडलेले रस्ते आणि त्यातून नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तातडीने मुरूम टाकून रस्ते वाहतुकीस योग्य करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पावसाळ्याच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारा हा निर्णय निश्चितच महत्त्वाचा आहे.
नगसेवकांच्या प्रभागातील विकासकामांची अंदाजपत्रके वेळेत तयार व्हावीत, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये आणि प्रशासनाने अधिक गतिमान पद्धतीने काम करावे, अशी अपेक्षा उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत झाला, तर शहरातील विकासकामांना निश्चितच गती मिळेल.
कामांच्या वाटपात पारदर्शकता, गुणवत्तेला प्राधान्य आणि प्रत्येक प्रभागाला न्याय मिळावा, यासाठीही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यामुळे भविष्यात विकासकामांमध्ये अधिक उत्तरदायित्व आणि गुणवत्तेची जाणीव निर्माण होण्यास मदत होईल.
जळगाव शहराच्या विकासासाठी केवळ निधी उपलब्ध असणे पुरेसे नसून त्या निधीचा योग्य आणि दर्जेदार वापर होणे तितकेच आवश्यक आहे. उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी घेतलेली आक्रमक पण लोकहिताची भूमिका शहराच्या विकासासाठी सकारात्मक पाऊल मानावे लागेल.
आता प्रशासन, अधिकारी आणि ठेकेदार यांनीही या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करून जळगावकरांना दर्जेदार रस्ते, वेळेत पूर्ण होणारी विकासकामे आणि विश्वासार्ह नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, हीच शहरवासीयांची अपेक्षा आहे.
