जनता लाईव्ह:– जळगाव शहरात उघडकीस आलेल्या ड्रग्ज आणि अत्याचार प्रकरणाने पुन्हा एकदा शहराच्या सामाजिक वास्तवावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला मैत्रीच्या नावाखाली व्यसनाच्या गर्तेत ढकलले गेले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणातील तिन्ही संशयितांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असली तरी, या प्रकरणामागे आणखी मोठे जाळे कार्यरत आहे का? हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. पोलिस तपासात इतर मुलींनाही अशाच प्रकारे ड्रग्जच्या माध्यमातून जाळ्यात ओढण्यात आले होते का? तसेच त्यांना ब्लॅकमेल किंवा मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले होते का? याचा शोध घेतला जात आहे.
मुख्य संशयिताकडून तरुणीचे फोटो काढण्यात आल्याची बाब समोर आली असून,हे फोटो सोशल मीडियावर किंवा इतर व्यक्तींना पाठवण्यात आले आहेत का? याचाही तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ अत्याचारापुरते मर्यादित नसून सायबर गैरवापराशीही संबंधित असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शहरात ड्रग्जचा पुरवठा नेमका कुठून होत आहे? तरुणाईपर्यंत हे अमली पदार्थ इतक्या सहजतेने कसे पोहोचत आहेत? यामागे एखादे संघटित रॅकेट सक्रिय आहे का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
समाजात वाढत चाललेली व्यसनाधीनता, सोशल मीडियाचा गैरवापर आणि तरुण पिढीला लक्ष्य करणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाईची गरज अधोरेखित होत आहे. या प्रकरणाचा तपास केवळ आरोपींपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण साखळी उघड करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने न्यायालयात तपासासाठी आवश्यक मुद्दे मांडले असून, पोलिसांकडून पुढील काही दिवसांत या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
