भंगार बाजारातील अतिक्रमणांवर पुन्हा जेसीबी चालणार?
खंडपीठाकडून मुदतवाढीच्या अर्जाला नकार; महापालिकेच्या कारवाईचा मार्ग मोकळा.
जळगाव प्रतिनिधी | जनता लाईव्ह जळगाव शहरातील भंगार बाजारातील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने या परिसरात जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली होती. मात्र, या कारवाईविरोधात भंगार व्यावसायिकांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेत न्यायालयाकडून तात्पुरते संरक्षण मिळवले होते. आता या संरक्षणाची मुदत वाढवण्याची मागणी न्यायालयाने मान्य न केल्याची माहिती महापालिका सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे भंगार बाजारातील अतिक्रमणांवर पुन्हा बुलडोझर चालण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
https://www.facebook.com/share/v/1N8xstRHJ9/
मुदतवाढीची मागणी फेटाळली
भंगार बाजारातील अतिक्रमणांवरील महापालिकेच्या कारवाईला आव्हान देत व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर संबंधित प्रकरणात मिळालेल्या तात्पुरत्या संरक्षणाच्या आदेशाची मुदत वाढवून २८ ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली होती.
या प्रकरणाची सुनावणी १४ ऑक्टोबर रोजी होणार होती. मात्र, २८ ऑक्टोबर रोजी निश्चित करण्यात यावी . दरम्यान, १५ ऑक्टोबर रोजी व्यावसायिकांनी तात्पुरत्या संरक्षणाची मुदत वाढवण्यासाठी विनंती अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिकेच्या कारवाईकडे लक्ष
न्यायालयाकडून मुदतवाढ न मिळाल्याने भंगार बाजारातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे का, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी महापालिकेने या परिसरात कारवाई सुरू केली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेमुळे या मोहिमेला अडथळा निर्माण झाला होता.
आता न्यायालयीन आदेशांची सद्यस्थिती तपासून महापालिका प्रशासन पुढील पाऊल उचलणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अतिक्रमणांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने कायद्यानुसार आणि पारदर्शक पद्धतीने कारवाई करणे अपेक्षित आहे.
भंगार बाजारातील अतिक्रमणांचा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. महापालिकेने यापूर्वी कारवाईचा बडगा उगारला असला, तरी आता पुढील कारवाई किती वेगाने होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखत अतिक्रमणांबाबत नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
त्यामुळे भंगार बाजारात पुन्हा जेसीबी धडकणार का, की प्रशासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रियेची प्रतीक्षा केली जाणार, याचे उत्तर येत्या काळात स्पष्ट होईल.
