जळगाव : रस्त्यावर बायोमेडिकल कचरा फेकणाऱ्या वरद पॅथॉलॉजी लॅबवर मनपाची दंडात्मक कारवाई..
जळगाव | प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक १२ अंतर्गत प्रभात चौक, शानबाग हॉल परिसरातील वरद पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांनी कानळदा रोड परिसरात बायोमेडिकल कचरा रस्त्यावर फेकल्याचा प्रकार उघडकीस आला. या गंभीर प्रकाराची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून संबंधित लॅबवर ₹५,००० दंडाची कारवाई केली.
बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट शासनाच्या नियमांनुसार लावणे बंधनकारक असताना तो सार्वजनिक ठिकाणी फेकल्याने नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनपाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित संस्थेविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.
ही कारवाई उपायुक्त सौ. निर्मला गायकवाड व अभियंता समीर बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी स्वच्छता निरीक्षक उज्ज्वल बेंडवाल व अजय चांगरे, सहायक धीरज गोडले, तसेच मुकादम रोहित ढंडोरे, निखिल बेंडवाल आणि अनिल देहडे उपस्थित होते.
महानगरपालिकेने सर्व रुग्णालये, पॅथॉलॉजी लॅब आणि वैद्यकीय आस्थापनांना बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट नियमांनुसार लावण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
