६० लाखांची धुळीत गेलेली मशीन — जबाबदार कोण?
जनता लाईव्ह :– जळगाव महानगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या गाजावाजात सुमारे ६० लाख रुपये खर्च करून धूलिकण नियंत्रणासाठी मशीन खरेदी केली. उद्देश चांगला होता.शहरातील वाढत्या धुळीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांना दिलासा देणे. मात्र, आज वास्तव काय आहे? हीच मशीन तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ दुरुस्तीसाठी पडून आहे, आणि शहरात तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना नागरिक धुळीच्या त्रासाला सामोरे जात आहेत.
२२ जानेवारी २०२६ रोजी ही मशीन दुरुस्तीसाठी ‘उज्ज्वल ऑटो’कडे पाठवण्यात आली. कारण सांगितले गेले वायरिंग जळाली, काही बॉक्स बदलावे लागतील. पण प्रश्न असा आहे की, तीन महिने आठ दिवस उलटूनही साधे स्पेअर पार्ट उपलब्ध होत नाहीत, ही बाब अत्यंत गंभीर आणि संशयास्पद नाही का?
जर एखाद्या मशीनचे सुटे भाग एवढ्या कालावधीत मिळत नसतील, तर खरेदीपूर्वी त्याचा पुरवठा, देखभाल आणि सेवा याबाबत योग्य चौकशी झाली होती का? की फक्त कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली? अशा निर्णयांमुळे नागरिकांचा विश्वास ढासळतो.
दरम्यान, शहरातील वाढते काँक्रिटीकरण तापमान अधिक वाढवणारे ठरत आहे. काँक्रिटच्या रस्त्यांमुळे उष्णतेचा साठा वाढतो आणि उकाड्याची तीव्रता नागरिकांना अधिक जाणवते. अशा परिस्थितीत ‘फॉग कॅनन’ किंवा पाण्याची फवारणी करणारे हे मशीन कार्यरत असते, तर धुळीची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकली असती. सध्या हवेतील गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक असला तरी, उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना उकाडा आणि धुळीचा दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.
मनपाच्या हलगर्जीपणाचाही या प्रकरणात मोठा वाटा असल्याचे दिसून येते. जानेवारी महिन्यातच या मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली होती. मात्र, योग्य वेळी दखल न घेतल्याने आणि वेळेत दुरुस्ती न झाल्याने मशीनची अवस्था अधिकच बिघडली. बॅटरी आणि इतर घटकांमध्येही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
ही बाब केवळ निष्काळजीपणाची नाही, तर संभाव्य भ्रष्टाचाराचीही दुर्गंधी देणारी आहे. कारण:
खरेदीपूर्वी तांत्रिक पडताळणी झाली का?
संबंधित कंपनी किंवा पुरवठादाराची विश्वसनीयता तपासली का?
देखभाल आणि स्पेअर पार्ट्सची उपलब्धता सुनिश्चित केली का?
दुरुस्तीला एवढा विलंब का होत आहे, याची जबाबदारी कोण घेणार?
या मशीनमध्ये सुमारे ३,००० लिटर पाण्याची क्षमता असलेली टाकी बसवण्यात आली आहे. या टाकीद्वारे रस्त्यांवर पाण्याची फवारणी करून धुळीवर नियंत्रण ठेवले जात होते. मोठ्या शहरांप्रमाणे जळगावमध्येही प्रदूषण आणि तापमान कमी करण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी ठरू शकली असती. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे आणि देखभालीतील ढिसाळपणामुळे ही यंत्रणा आज निष्प्रभ ठरली आहे.
नागरिकांचा पैसा म्हणजे सरकारी तिजोरी नाही की हवा तसा खर्च करावा. तो करदात्यांच्या कष्टाचा पैसा आहे. आणि तो अशा प्रकारे वाया घालवला जात असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
आज जळगाव शहरात धुळीचा त्रास वाढत असताना, धूलिकण नियंत्रणासाठी घेतलेली मशीनच उपयोगात नसणे ही प्रशासनाची अपयशाची कबुली आहे. यावर तात्काळ उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींना शिक्षा व्हावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी ठोस धोरण राबवणे गरजेचे आहे.
नागरिक विचारत आहेत ६० लाखांचा हिशोब कोण देणार?

