सामाजिक ऐक्य, संविधानिक मूल्ये आणि बौद्ध तत्त्वांचा संदेश देण्याचा निर्धार
जनता लाईव्ह :– संविधान नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२६ ची घोषणा करण्यात आली असून, सामाजिक ऐक्य, समता आणि बौद्ध मूल्यांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह मानले जात आहे. मैत्रीय बुद्ध विहार येथे पार पडलेल्या बैठकीत समितीची रचना जाहीर करण्यात आली. परिसरातील नागरिक, समाजबांधव आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला असून, या माध्यमातून जयंती उत्सव अधिक संघटित व प्रभावीपणे साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्य अर्पण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १८९१ मधील जन्मवर्षानुसार यंदा त्यांची १३५ वी जयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या विचारांचा प्रसार, संविधानिक मूल्यांची जपणूक, शिक्षणाची प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस समितीने व्यक्त केला. जयंती उत्सव हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता समाजपरिवर्तनाचा संदेश देणारा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याचबरोबर करुणा, समता आणि प्रज्ञेचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित समाजजागृती कार्यक्रम, प्रबोधनपर व्याख्याने आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्याची रूपरेषाही चर्चेत मांडण्यात आली. बुद्धांच्या शिकवणुकीतून मानवतावाद आणि शांततेचा संदेश समाजात अधिक दृढ करण्यावर समितीचा भर राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
समितीची रचना पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे —अध्यक्ष : अमर सोनवणे,उपाध्यक्ष : नितीन खरे,खजिनदार : रवी सपकाळे,सदस्य : सर्व समाजबांधव
या बैठकीस प्रवीणभाऊ इंगळे, रवी सपकाळे, धनराज भाऊ चव्हाण, अनुप इंगळे,सोनू गाढे,संतोष बिऱ्हाडे,राजेश भालशंकर,भरत तायडे,जितू सोनोवणे,गौतम सोनोवणे,तुषार सुतार, नितीन अडोकमोल,तसेच इतर समाजबांधव उपस्थित होते. उपस्थितांनी समितीच्या स्थापनेचे स्वागत करत जयंती उत्सव भव्य, शिस्तबद्ध आणि समाजप्रेरक करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
समाजातील विविध घटकांना एकत्र आणत बंधुता आणि संविधानिक मूल्यांची जाणीव दृढ करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी ठरणार आहे. नव्याने नियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून सामाजिक एकोप्याचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
