धुळखात पडलेल्या वाहनांवर कारवाईचे निर्देश; गटारी सफाईसाठी महापौरांचे आदेश
महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत वार्ड क्रमांक ७ मध्ये पाहणी; अतिक्रमण हटविणे, पाण्याची नासाडी रोखणे आणि परिसर स्वच्छ करण्यावर भर
जळगाव/प्रतिनिधी : शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत वार्ड क्रमांक ७ मधील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात गटारींची अस्वच्छता, अतिक्रमण, धुळखात पडलेली वाहने आणि पाण्याची नासाडी यांसारख्या समस्यांवर महापौरांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित विभागांनी तातडीने कारवाई करून नागरिकांना स्वच्छ व सुव्यवस्थित परिसर उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी महापौर दीपमाला काळे, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, विशाल भोळे, अंकिता पंकज पाटील, आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, बांधकाम विभागाचे विशाल सुर्वे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बंद टपऱ्या हटविण्याचे निर्देश
गणेश कॉलनी चौकातील गुरुदत्त मंदिर परिसरात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या बंद पडलेल्या टपऱ्या तातडीने हटविण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. तसेच वार्डातील अनेक ठिकाणी गटारींची नियमित सफाई झालेली नसल्याचे आणि काही ठिकाणी गटारींवर अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या गटारींची स्वच्छता करून अतिक्रमणाची समस्या सोडविण्यासाठी आरोग्य व बांधकाम विभागाला निर्देश देण्यात आले.
धुळखात पडलेल्या वाहनांसह साहित्य हटविणार
बजरंग बोगदा परिसरात धुळखात पडलेले साहित्य, बंद अवस्थेतील अतिक्रमणांचे सांगाडे आणि वाढलेले गवत तातडीने हटविण्याचे आदेश महापौरांनी दिले. परिसरात तीन ठिकाणी बंद अवस्थेत धुळखात पडलेली चारचाकी वाहने आढळून आली. ही वाहने तात्काळ हटविण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
पाण्याची नासाडी रोखण्यासाठी नोटीस
पाहणीदरम्यान एका ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे आढळले. यावर महापौरांनी नाराजी व्यक्त करत संबंधित व्यक्तीला तातडीने नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिमेंट रस्त्याच्या कामाची पाहणी
गणेश कॉलनी परिसरातील श्रीहरी नगर येथे सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाचीही महापौर दीपमाला काळे यांनी नगरसेवक व अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
शहरातील स्वच्छता, अतिक्रमणमुक्त रस्ते आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर भर देत महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत विविध भागांची पाहणी सुरू असून, नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
