ढाकेवाडीत परवानगीविना वृक्षतोड? कुऱ्हाड आणि आधुनिक मशिनरीच्या सहाय्याने झाडे पाडून दोन वाहनांतून लाकूड नेल्याचा आरोप…
जनता लाईव्ह | प्रतिनिधी एकीकडे पर्यावरण संवर्धनासाठी देशभर विविध उपक्रम राबविले जात असताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक झाड माँ के नाम” या अभियानाला प्रतिसाद देत लोकप्रतिनिधी, प्रशासन, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील ढाकेवाडी परिसरात परवानगीविना वृक्षतोड झाल्याचा आरोप समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नगरसेविका रेश्मा कुंदन काळे यांच्या सांगण्यावरून रस्त्यालगतची मोठी झाडे व त्यांच्या विशाल फांद्या तोडण्यात आल्या. विशेष म्हणजे, संबंधित झाडांमुळे वाहतुकीला किंवा परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका अथवा अडथळा निर्माण होत नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
कुऱ्हाडीसह आधुनिक कटिंग मशिनरीचा वापर वृक्षतोडीसाठी केवळ पारंपरिक साधनांचा नव्हे, तर आधुनिक वूड कटिंग मशिनरीचाही वापर करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अवघ्या काही वेळात मोठी झाडे व फांद्या कापून टाकण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेसाठी महापालिकेची अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दोन ‘छोटा हत्ती’ वाहनांतून लाकूड हलविल्याचा दावा झाडे तोडल्यानंतर त्यांचे लाकूड घटनास्थळी न ठेवता दोन ‘छोटा हत्ती’ वाहनांमध्ये भरून अन्यत्र नेण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे ही वृक्षतोड नेमक्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली आणि लाकडांची विल्हेवाट कशा पद्धतीने लावण्यात आली, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, तसेच परवानगीशिवाय वृक्षतोड झाली असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिक प्रतिक्रिया :- “रस्त्यावरील झाडांमुळे कोणालाही कोणताही धोका नव्हता. तरीही कुऱ्हाड आणि आधुनिक कटिंग मशिनरीच्या सहाय्याने झाडे तोडण्यात आली. झाडे कापून लाकूड वाहनांतून नेले जात असताना प्रशासन कुठे होते? या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.”
आमच्या डोळ्यासमोर वाढलेले झाड आम्ही आमच्या हाताने त्याला पाणी टाकून वाढवलेले होते आमच्या डोळ्यासमोर तोडल्यामुळे मनाला खूप दुःख झाले, तरी आज आम्ही परत या ठिकाणी नवीन झाडे लावली 100 झाडांचा आमचा संकल्प आहे आज आम्ही 25 झाडे लावली.
प्रकाश पाटील पर्यावरण – अधिकाऱ्यांची भूमिका “या संदर्भातील कोणतीही माहिती माझ्याकडे नाही. संबंधित विभागप्रमुखांकडे याबाबत माहिती असू शकते.”
योगेश वाणी – “ढाकेवाडीतील वृक्षतोडीबाबत आम्ही कोणतीही परवानगी दिलेली नाही. पूर्वीची काही परवानगी अस्तित्वात आहे का, याची पडताळणी करावी लागेल. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यास नियमानुसार चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.”
