आकाशवाणी चौकात रणगाडा उभारावा; जळगावच्या शौर्यस्मृतीला नवी ओळख देण्याची मनसेची मागणी
जळगाव | प्रतिनिधी शहरातील चौक हे केवळ वाहतुकीचे केंद्र नसून ते त्या शहराचा इतिहास, संस्कृती, राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमानाचे प्रतीक असतात. याच भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जळगावातील जनरल अरुण वैद्य चौक (आकाशवाणी चौक) येथे भारतीय सैन्याचा सेवामुक्त रणगाडा उभारण्याची मागणी करत महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. ही मागणी केवळ एका राजकीय पक्षाची नसून जळगावच्या सौंदर्यात भर घालणारी, तरुण पिढीमध्ये देशभक्तीची प्रेरणा जागवणारी आणि शहराच्या वैभवात मोलाची भर घालणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी सांगितले की, भारतीय सैन्याचे माजी सरसेनापती जनरल अरुण वैद्य यांनी देशाच्या सुरक्षेसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या नावाने चौकाचे नामकरण करून केवळ फलक लावणे पुरेसे ठरत नाही. त्या नावाला साजेशे शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा प्रत्यक्ष स्वरूपात नागरिकांसमोर उभी राहणे आवश्यक आहे. त्यामुळे या चौकात सेवामुक्त रणगाडा उभारल्यास ते जनरल वैद्य यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल.
यापूर्वी या चौकात दोन्ही बाजूंना लहान तोफा बसविण्यात आल्या होत्या. त्या पाहून अनेक नागरिकांना भारतीय सैन्याच्या पराक्रमाची आठवण होत असे. मात्र कालांतराने त्या हटविण्यात आल्याने चौकाची ऐतिहासिक ओळख आणि आकर्षण कमी झाले आहे. रणगाडा उभारल्यास चौकाला पुन्हा एकदा प्रेरणादायी आणि देखणे स्वरूप प्राप्त होईल.
देशातील अनेक शहरांमध्ये सेवामुक्त रणगाडे, तोफा आणि लढाऊ विमाने सार्वजनिक ठिकाणी उभारून राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला जातो. अशा स्मारकांमुळे नागरिकांसह लहान मुलांना आणि तरुणांना भारतीय सैन्याच्या शौर्याची ओळख होते. जळगावसारख्या ऐतिहासिक आणि वेगाने विकसित होत असलेल्या शहरातही अशा प्रकारचे स्मारक उभारणे ही काळाची गरज असल्याचे मनसेने नमूद केले आहे.
या संदर्भात मनपा प्रशासनाने संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सैन्याशी आवश्यक समन्वय साधून सेवामुक्त रणगाडा उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच निधी अथवा प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसहभागातून निधी उभारून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत हा उपक्रम साकार करण्यासाठी पुढाकार घेईल, अशी भूमिका ॲड. जमील देशपांडे यांनी स्पष्ट केली.
त्यांनी पुढे सांगितले की, “शहरातील चौक हे केवळ रस्त्यांचे संगम नसतात, तर ते शहराचा इतिहास आणि स्वाभिमान सांगणारे जिवंत स्मारक असतात. जनरल अरुण वैद्य यांच्या नावाने असलेल्या चौकात रणगाडा उभारणे म्हणजे जळगावच्या भूमीकडून भारतीय सैन्याला दिलेली अभिमानाची सलामी असेल.”
मनसेच्या मते रणगाडा हा केवळ लोखंडाचा तुकडा नसून भारतीय सैनिकांच्या शौर्य, त्याग, पराक्रम आणि राष्ट्ररक्षणाच्या अखंड संकल्पाचे जिवंत प्रतीक आहे. अशा स्मारकांमधून पुढील पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळते आणि राष्ट्रासाठी योगदान देणाऱ्या वीरांविषयी आदराची भावना अधिक दृढ होते.
या वेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळले, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, ललित शर्मा, चेतन पवार, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
