आरोग्य विभागातील कथित आर्थिक घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू!
मनपा आयुक्त आदित्य जीवने यांचा मोठा निर्णय; ५ सदस्यीय समिती नियुक्त, दोषींवर कठोर कारवाईसह आर्थिक वसुलीचे आदेश
प्रतिनिधी | जळगाव
जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कथित आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहाराच्या प्रकरणाने अखेर निर्णायक वळण घेतले आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी मनपा आयुक्त आदित्य जीवने यांनी पाच सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती केली असून, संबंधित सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
चौकशीदरम्यान बी.व्ही.जी. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती, कचरा संकलनाचे प्रत्यक्ष वजन, आयसीटी प्रणालीतील नोंदी, संशयास्पद देयके आणि बिलांची विशेष लेखापरीक्षणाद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी होणार आहे.
उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून या कथित गैरप्रकारांबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी लेखी निवेदने देण्यासह महासभेतही हा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. मात्र, संबंधित स्तरावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ३० जून रोजी आयुक्तांकडे स्वतंत्र चौकशीची मागणी करण्यात आली.
या तक्रारीची गंभीर दखल घेत आयुक्तांनी ९ जुलै रोजी अधिकृत आदेश काढून चौकशी समिती स्थापन केली. समितीला तक्रारीतील प्रत्येक मुद्द्याची सखोल तपासणी करून संबंधित सर्व फाईल्स, नोंदी आणि दस्तऐवज ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चौकशीत अधिकारी, कर्मचारी किंवा कंत्राटदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. तसेच महानगरपालिकेचे झालेले आर्थिक नुकसान संबंधित जबाबदार व्यक्तींकडून वसूल केले जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
पाच सदस्यीय चौकशी समिती
- अतिरिक्त आयुक्त – अध्यक्ष
- उपायुक्त (महसूल) – सदस्य सचिव
- मुख्य लेखापरीक्षक – सदस्य
- सहायक आयुक्त (आस्थापना) – सदस्य
- योगेश वाणी (कनिष्ठ अभियंता) – सदस्य
जनता लाईव्ह विश्लेषण
आरोग्य विभागातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी प्रथमच वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. या चौकशीतून गैरव्यवहाराचे सत्य समोर येणार का, दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होणार का आणि मनपाच्या आर्थिक नुकसानीची वसुली होणार का, याकडे आता संपूर्ण जळगावचे लक्ष लागले आहे.

