आयटीआयजवळील कचरा डेपोला अखेर ‘डेडलाइन’; टीबी सेंटरमधील पर्यायी केंद्राचे ९५% काम पूर्ण
जळगाव | प्रतिनिधी :
गव्हर्मेंट आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर अखेर या केंद्राला मुदतीची डेडलाइन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनंतर मनपा प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने पावले सुरू झाली असून, आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र एका महिन्याच्या आत बंद करून टीबी सेंटर येथील पर्यायी केंद्रात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी ABVP तसेच गव्हर्मेंट आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी आयटीआय परिसरातील कचरा डेपो हटविण्याची आक्रमक मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेता मनपा आयुक्त आदित्य जीवने, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी संबंधित कचरा डेपो एका महिन्याच्या आत बंद करण्याचे आश्वासन दिले होते.
या पार्श्वभूमीवर दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी आज टीबी सेंटर येथील प्रस्तावित कचरा संकलन केंद्राच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित मक्तेदार इंजिनिअर आणि मनपा इंजिनिअर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या केंद्राचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित पाच टक्के कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे.
मात्र, केवळ पर्यायी केंद्र उभारणे पुरेसे नसून आयटीआय परिसरातील कचरा संकलन केंद्र प्रत्यक्षात बंद होणार का, हा विद्यार्थ्यांसह नागरिकांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत जुन्या केंद्राची प्रक्रिया थांबवून नव्या ठिकाणी कचरा संकलन सुरू करण्याची जबाबदारी आता मनपा प्रशासनावर आहे.
या संपूर्ण कामाचा आढावा मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार असून, त्यानंतर आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र बंद करून टीबी सेंटर येथे कचरा संकलन प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आता आश्वासनाप्रमाणे प्रत्यक्षात कचरा डेपो हटतो का आणि दिलेली महिन्याची मुदत पाळली जाते का, याकडे विद्यार्थी व परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या पाहणीप्रसंगी प्रकल्प प्रमुख योगेश वाणी, संबंधित ठेकेदारांचे इंजिनिअर तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे पीएमसी कर्मचारी उपस्थित होते.
