जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) नवीन वाहन फिटनेस व लायसन्स चाचणी ट्रॅकवरील असुविधांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, नागरिकांच्या हालअपेष्टा तातडीने थांबवण्याची मागणी करत RTO प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जळगाव शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या RTO च्या वाहन फिटनेस टेस्टिंग ट्रॅक आणि कायमस्वरूपी लायसन्स चाचणी ट्रॅकवर दररोज शेकडो वाहन चालक व नागरिक विविध कामांसाठी येत असतात. मात्र या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून कडक उन्हात नागरिकांना तासनतास उभे राहावे लागत आहे. ट्रॅकवर पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच नागरिकांना बसण्यासाठी किंवा सावलीत थांबण्यासाठी कोणतीही शेड उपलब्ध नसल्याने नागरिकांना उन्हातच थांबावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहांचीही कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हा परिसर शहरापासून लांब असल्याने आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळवणेही कठीण होते, अशीही तक्रार मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर ट्रॅकवर तातडीने पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे, नागरिकांना बसण्यासाठी प्रशस्त व सावलीची शेड उभारणे तसेच फिरते किंवा कायमस्वरूपी स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे या मागण्या मनसेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन येत्या आठ दिवसांत आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, खुशाल ठाकूर, युसुफ खाटीक, अश्फाक शहा, आली खाटीक यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
