सार्वजनिक सुविधांची दुर्दशा आणि प्रशासनाची उदासीनता
जनता लाईव्ह :– जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील सागर पार्क परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. शौचालयातील सांडपाणी थेट मैदानावर वाहत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. या समस्येमुळे सकाळ-संध्याकाळ व्यायाम, फिरणे किंवा खेळासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
महानगरपालिकेने नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी उभारलेली ही व्यवस्था प्रत्यक्षात नागरिकांसाठीच डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. स्वच्छतेचा अभाव, योग्य निचरा व्यवस्थेची कमतरता आणि देखभालीकडे केलेले दुर्लक्ष यामुळे सार्वजनिक शौचालये ही सुविधा नसून समस्या बनत चालली आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मधील नगरसेविका गायत्री इंद्रजीत राणे यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात संबंधित समस्येवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ही बाब केवळ एका प्रभागापुरती मर्यादित नसून शहरातील अनेक भागांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचे दिसून येते.
महानगरपालिकेने तात्काळ याची दखल घेऊन सांडपाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करणे, स्वच्छता राखणे आणि नियमित देखभाल करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सार्वजनिक सुविधा ही केवळ उभारण्यापुरती नसून तिची देखभाल आणि कार्यक्षमतेची जबाबदारीही प्रशासनाचीच असते, हे संबंधित यंत्रणांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

