जनात लाईव्ह :– जळगाव : शहरात मोठमोठ्या नावाखाली कार्यक्रमांचा गाजावाजा करायचा, लाखोंची उलाढाल करायची आणि त्याच वेळी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियम धाब्यावर बसवायचे हा प्रकार आता उघडपणे घडू लागला आहे. जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटना (JJITA) यांच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान खान्देश सेंट्रल मॉल येथे आयोजित ‘IT व सुरक्षा एक्स्पो’च्या निमित्ताने उघड झालेल्या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
प्रचारासाठी शहरभर उभारण्यात आलेली भलीमोठी होर्डिंग्ज आणि प्रवेशद्वारावर उभारलेली दुतर्फा भव्य गेट्स हे सर्व कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय उभारण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. नियमांनुसार अशा जाहिराती व संरचनांसाठी कर व परवानगी बंधनकारक असताना आयोजकांनी त्याची उघडपणे पायमल्ली केली, असे चित्र दिसते. हा केवळ नियमभंग नाही, तर महानगरपालिकेच्या महसुलावर डल्ला मारण्यासारखाच प्रकार मानावा लागेल.
अधिक धक्कादायक बाब म्हणजे महानगरपालिकेच्या नजरेसमोर हे सर्व सुरू असतानाही कारवाईचा पत्ता नाही. अतिक्रमण विभागातील वसंत पाटील या कर्मचाऱ्यांकडून उत्तर देण्यात आले “हा रस्ता आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही” असे सांगून जबाबदारी झटकली गेली. म्हणजे नियम मोडले गेले तरी विभाग एकमेकांकडे बोट दाखवत बसणार का? शहरात प्रशासन आहे की केवळ कागदी यंत्रणा असा संतप्त सवाल नागरिकांना पडणे स्वाभाविक आहे.
नियम सामान्य नागरिकांसाठी कडक आणि मोठ्या आयोजकांसाठी शिथिल अशी दुहेरी भूमिका प्रशासन घेत आहे का, हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. महसूल बुडवण्याच्या अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नियमभंगाला मूक संमती देण्यासारखे आहे. यामुळे कायद्याचा धाक कमी होऊन अराजकतेला खतपाणी घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता आयोजकांवर तसेच नियमभंगाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर महानगरपालिकेकडून ठोस व पारदर्शक कारवाई केली जाते का, की हा प्रकारही नेहमीप्रमाणे दडपून टाकला जातो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे
