जळगाव | प्रतिनिधी
जळगाव महानगरपालिकेच्या निकालापूर्वी शहरातील एका हायवेवर बिनानंबर प्लेटचे दोन डंपर, त्यामध्ये भरलेला गुलाल घेऊन उभे असल्याचे दृश्य नागरिकांच्या नजरेस पडले असून या घटनेने शहरात खळबळ उडवली आहे. निवडणुकीच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या उभे असलेले डंपर हे केवळ संशयास्पदच नव्हे, तर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही गंभीर बाब ठरते. वाहनांना नंबर प्लेट नसणे, मालाची वैध माहिती उपलब्ध नसणे आणि तरीही हायवेवर कोणतीही कारवाई न होता हे डंपर उभे राहणे, यामुळे कायदा सर्वांसाठी समान आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महानगरपालिकेच्या निकालाआधी गुलालाचा साठा असलेले डंपर आढळणे हा निव्वळ योगायोग मानायचा का, की निकालानंतरच्या जल्लोषाची आधीच केलेली तयारी यामागे आहे, अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. जर सामान्य नागरिकाने अशा प्रकारे बिनानंबर वाहन रस्त्यावर उभे केले असते, तर तत्काळ दंडात्मक कारवाई झाली नसती का, हा सवालही उपस्थित होत आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारच्या हालचालींकडे प्रशासनाने डोळेझाक केली असल्यास, ती बाब लोकशाहीसाठी धोक्याची ठरू शकते.
लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून ती कायद्याच्या समान अंमलबजावणीवर आणि प्रशासनाच्या निष्पक्ष भूमिकेवर अवलंबून असते. मात्र अशा घटनांमुळे प्रशासनावर दबाव आहे का, काहींना मोकळीक दिली जाते का, अशी भावना नागरिकांमध्ये बळावत आहे. या प्रकरणी डंपरची मालकी कोणाची, गुलाल कुठून आणण्यात आला, त्यासाठी परवानगी होती का आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बिनानंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाई का झाली नाही, याबाबत पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग आणि निवडणूक आयोगाने तातडीने खुलासा करणे गरजेचे आहे.
आज प्रश्न केवळ गुलालाचा नसून लोकशाहीच्या रंगाचा आहे. तो रंग कायद्याचा असेल की सत्तेच्या माजाचा, हे ठरवण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. लोकशाही टिकवायची असेल, तर प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांच्या शंकांना दुर्लक्ष करून नव्हे, तर ठोस उत्तर आणि कठोर कारवाई करूनच तिचे संरक्षण करावे लागेल.
संबंधित जळगाव आरटीओ कार्यालयाशी संपर्क केल्या असता लवकरच पथक हे कारवाई करण्यासाठी रवाना होणार या आशयाचे उत्तर आमच्या प्रतिनिधींना देण्यात आले.
