सावखेडे शिवारातील वाघनगरत पाणीटंचाई कायम; तर दुसरीकडे फुटलेल्या पाईपलाईनमधून दर पंधरा दिवसांनी हजारो लिटर पाण्याची नासाडी
जळगाव | प्रतिनिधी एकीकडे सावखेडे शिवारातील वाघनगरी परिसरातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकत आहेत, तर दुसरीकडे विश्वकर्मा चौक ते बालाजी पार्क मार्गावरील फुटलेल्या पाईपलाईनमधून दर पंधरा दिवसांनी हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वाघनगर परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांनी यापूर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते. तसेच काही दिवसांपूर्वी महिलांच्या सहभागातून हंडा मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र या आंदोलनानंतरही परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही कायम असून अनेक कुटुंबांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.
याचवेळी विश्वकर्मा चौकातून बालाजी पार्ककडे जाणाऱ्या मार्गावर मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा सुरू होताच मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून जाते. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दर पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होताना हजारो लिटर पाणी वाया जाते. परिणामी जलवाहिनीच्या शेवटच्या टप्प्यात राहणाऱ्या नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या गंभीर समस्येबाबत ग्रामसेवक दिलीप पाटील यांना अनेक वेळा तोंडी तसेच लेखी स्वरूपात माहिती देण्यात आली आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
एकीकडे पाण्याच्या एका हंड्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत असताना दुसरीकडे मौल्यवान पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे. जलसंकटाच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना अशी होणारी नासाडी तातडीने थांबविण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करावी, पाण्याची होणारी नासाडी थांबवावी आणि वाघनगर परिसरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

