मनसेच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची दखल; आरटीओ ट्रायल ‘आदर्श नगर’ला हलवण्याचा निर्णय
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव आरटीओच्या नवीन फिटनेस व लायसन्स टेस्ट ट्रॅकवरील असुविधांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने अखेर दखल घेतली आहे. मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून, सोमवार दिनांक ६ एप्रिलपासून वाहन चालविण्याच्या चाचण्या (ट्रायल) तसेच वाहन फिटनेस टेस्टिंग आदर्श नगर येथील आरटीओ कार्यालयातच घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरापासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या ट्रॅकवर पिण्याचे पाणी, सावलीची शेड आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. विशेषतः वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला होता.
दरम्यान, नव्या नियमानुसार फिटनेस टेस्टिंग ट्रॅकचे बांधकाम सुरू असताना रस्त्यात बदल करण्यात आल्याची माहिती राजेंद्र वर्मा यांनी दिली.
या सर्व समस्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत निवेदन सादर केले होते. जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, खुशाल ठाकूर, युसुफ खाटीक, अश्फाक शहा, आली खाटीक यांच्यासह महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनसेच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने त्वरित निर्णय घेत नागरिकांना दिलासा दिला असून, आता सर्व चाचण्या शहरातील आदर्श नगर येथील आरटीओ कार्यालयातच होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

