महापौर दीपमाला काळेंची वार्ड ६ मध्ये अचानक पाहणी; कचरा, अतिक्रमणावर कडक कारवाईचे आदेश!
शाहूनगर, ट्रॅफिक गार्डन आणि उर्दू शाळेची झाडाझडती; संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश
जळगाव प्रतिनिधी : महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत महापौर दीपमाला मनोज काळे यांनी गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी वार्ड क्रमांक ६ मधील शाहूनगर, ट्रॅफिक गार्डन आणि उर्दू शाळा परिसराची अचानक पाहणी केली. यावेळी स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अतिक्रमणाच्या समस्यांवर संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात आले.
कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
ट्रॅफिक गार्डन परिसरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना प्रथम नोटीस आणि त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले. शाहूनगर मार्केटमधील दुकानदारांना दुकानासमोर डस्टबिन ठेवण्याची सक्ती करण्यात आली.
पाणीगळती रोखण्याचे निर्देश
शाहूनगर पाणीपुरवठा विभागात कर्मचारी उपस्थितीची तपासणी करत महापौरांनी हालचाल रजिस्टर पाहिले. परिसरातील पाण्याचे कनेक्शन आणि नळाच्या तोट्या तातडीने दुरुस्त करून पाणी वाया जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले.
उर्दू शाळेच्या दुरवस्थेवर नाराजी
उर्दू शाळा क्रमांक १२ ची संरक्षण भिंत तुटलेली असून परिसरात भंगार गोळा केले जात असल्याचे निदर्शनास आले. यावर महापौरांनी मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तातडीने लेखी स्पष्टीकरण मागितले.
अतिक्रमण हटविण्याचे आदेश
शाहूनगर आणि ट्रॅफिक गार्डन परिसरातील बंद पडलेल्या रिक्षा व बेकायदेशीर अतिक्रमणे हटवून भंगार जप्त करण्याचे निर्देश अतिक्रमण विभागाला देण्यात आले. तसेच परिसरातील गटारी मोकळ्या करून स्वच्छता राखण्याचे आदेश दिले.
यावेळी नगरसेवक दीपक सूर्यवंशी, ॲड. शुचिता हाडा, अर्शीनबानो खाटीक, शहर अभियंता आर. टी. पाटील, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
