मेहरुण येथील ‘जैन ड्रीम स्पेसेस’ क्रीडांगणावर T-20 चा थरार; कान्हदेशातील खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेटचे व्यासपीठ
जळगाव दि.२० (प्रतिनिधी) : क्रिकेटप्रेमी जळगावकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने ‘जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व 2’ चे भव्य आयोजन करण्यात येणार असून, या स्पर्धेची अधिकृत घोषणा संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी केली. यावेळी व्यासपीठावर अॅड. सुरज जहागिर, उपाध्यक्ष युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे आणि खजिनदार राजेंद्र लढ्ढा उपस्थित होते.

Indian Premier League (आयपीएल) च्या धर्तीवर नियमावली असलेली ही स्पर्धा मेहरुण परिसरातील कांताई नगर येथील ‘जैन ड्रीम स्पेसेस’ क्रीडांगणावर रंगणार आहे. या स्पर्धेमुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा क्रिकेटचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळणार आहे.
“Own The Game, Lead The League, Build Legacy” अर्थात “खेळावर आपले स्वामित्व मिळवा, लीगचे नेतृत्व करा आणि कायमस्वरूपी वारसा निर्माण करा” या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात येणारी ही लीग जळगावसह संपूर्ण कान्हदेशातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा सादर करण्याची सुवर्णसंधी देणार आहे. ही स्पर्धा पांढऱ्या लेदर बॉलवर खेळविण्यात येणार असून, स्थानिक खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या लीगच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देणे, क्रिकेटचा दर्जा उंचावणे आणि जळगावच्या क्रीडा संस्कृतीला चालना देणे हा मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्ष अतुल जैन यांनी सांगितले. जळगाव क्रिकेट लीग ही केवळ स्पर्धा नसून, जळगावकरांसाठी क्रिकेटचा उत्सव ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विशेष माहिती (Info Box)
स्पर्धा : जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026 (पर्व 2)
आयोजक : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन
स्थळ : जैन ड्रीम स्पेसेस, कांताई नगर, मेहरुण
स्वरूप : Indian Premier League च्या धर्तीवर T-20 क्रिकेट स्पर्धा
विशेषता : पांढरा लेदर बॉल, खेळाडूंचे रंगीत कपडे, दिवस-रात्र सामने
क्रिकेट : कान्हदेशातील खेळाडूंना व्यासपीठ आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा!
“नवा जोश आणि नव्या थरारासह जळगाव क्रिकेट T-20 लीग सज्ज झाली आहे! खेळाची ताकद आणि जळगावची शान म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे. जळगाव व कान्हदेशातील क्रिकेटपटूंना मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळावी आणि स्थानिक खेळाडूंना चालना मिळावी, या उद्देशाने या लीगचे आयोजन करण्यात आले आहे. मैदानावर दमदार खेळाचे प्रदर्शन होऊन जळगावचा गौरव वाढेल. जळगावकरांना मिळणार आहे आता एक मोठा मौका… जळगाव क्रिकेट लीगचा! खेळाडूंना खेळाचा तर व्यावसायिकांना व्यवसायाचा अवसर उपलब्ध होणार आहे.
या स्पर्धेत जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी जाहीर केलेल्या पात्र खेळाडूंनाच नोंदणी केल्यानंतर सहभागी होता येणार असल्याचेही संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.*
