प्रशासकीय मान्यता की अनियमितता? वाल्मिक चौक–अप्सरा चौक रस्ते कामावर प्रश्नचिन्ह
भुसावळ : शहरातील वाल्मिक चौक ते अप्सरा चौक दरम्यान सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण व दुभाजका बांधकामाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधित काम प्रशासकीय मान्यता व तांत्रिक निकषांनुसार होत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग व जळगाव प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करत कामातील त्रुटींची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार, सदर रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनियमितता दिसून येत आहे. प्रशासकीय मान्यतेनुसार काम न करता घाईघाईने व नियमबाह्य पद्धतीने काम होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना व तांत्रिक देखरेखीचा अभाव असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर कामाची तातडीने तांत्रिक तपासणी करून प्रशासकीय मान्यता तपासावी, दोषींवर कारवाई करावी व मान्यतेनुसार काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी सोनवणे यांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करत दि. १० फेब्रुवारी २०२६ पासून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय, भुसावळ येथे आमरण उपोषण सुरू केले असून, दोषींवर पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे. उपोषणस्थळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी कर्तव्यावर तैनात आहेत.
संपादकीय दृष्टिकोनातून पाहता, सार्वजनिक निधीतून होणाऱ्या पायाभूत कामांमध्ये पारदर्शकता व गुणवत्तेचे निकष पाळले जाणे अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या कराच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये त्रुटी असल्यास त्याची चौकशी होणे ही लोकशाही व्यवस्थेची गरज आहे. त्याचवेळी प्रशासनानेही तक्रारी गांभीर्याने घेत योग्य ती स्पष्टता देणे आवश्यक आहे, जेणेकरून गैरसमज दूर होऊन कामांबाबत विश्वास निर्माण होईल. विकासकामे ही केवळ गतीने नव्हे तर गुणवत्तेने पूर्ण होणे हेच खऱ्या अर्थाने सार्वजनिक हिताचे ठरते.
