जळगाव (प्रतिनिधी) निवडणुकीनंतर महापौर पदासाठी हालचालींना वेग आला असून, यंदा भाजप सामाजिक समतोल साधण्यासाठी ‘मराठा कार्ड’ खेळणार का, याबाबत जळगावच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महापौर पदाचे आरक्षण ओबीसी महिला राखीव असले, तरी निवडीमध्ये सामाजिक समीकरणे आणि आगामी निवडणुकांचे गणित महत्त्वाचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
महापौरपदासाठी भाजपकडून दीपमाला काळे, उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे आणि वैशाली पाटील अशी नावे चर्चेत आहेत. त्यापैकी मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी वैशाली पाटील यांच्या नावाला पसंती द्यावी, अशी मागणी विविध स्तरातून पुढे येत आहे. जळगाव महापालिकेच्या इतिहासाकडे पाहिले असता मराठा समाजाला आजवर महापौरपदाची संधी अत्यल्प प्रमाणात मिळाल्याचे चित्र आहे. शहर व जिल्ह्यात संख्येने मोठा असलेला मराठा समाज अद्याप अपेक्षित प्रतिनिधित्वापासून वंचित असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महापालिकेत मराठा समाजाचे प्रतिनिधित्व अत्यल्प राहिल्याने यावेळी सामाजिक समतोल साधावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कारण सध्या जळगाव आमदार लेवा समाजाचे आहेत, केंद्रातही लेवा समाजाचे मंत्री आहेत, मात्र जिल्ह्यात मराठा समाजाचा एकही मंत्री नसल्याचा मुद्दा चर्चेत आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाला संधी दिल्यास समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि त्याचा राजकीय लाभ होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. तसेच सर्वसामान्य कुटुंबातील, कोणताही राजकीय वारसा नसलेल्या आदर्श गृहिणीला महापौरपदापर्यंत पोहोचवण्याची क्षमता फक्त भाजपकडेच आहे, असा संदेशही जनतेपर्यंत जाऊ शकतो. तसेच ‘लाडक्या बहिणींना न्याय’ देणारा पक्ष म्हणून भाजपची प्रतिमा अधिक बळकट होईल, असेही बोलले जात आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मराठा समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने गिरीश महाजन देखील सकारात्मक भूमिका घेऊ शकतात अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जळगावच्या राजकारणात महाजन यांचा प्रभाव मोठा असून, महापौरपदाचा अंतिम निर्णय त्यांच्या भूमिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार असल्याचे मानले जाते. जळगाव जिल्हा मराठा बहुल असून गेल्या काही वर्षांत मोठी संधी मिळाली नसल्याची भावना समाजात आहे. त्यामुळे मराठा समाजाला सामावून घेणे ही काळाची गरज असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
