जळगाव | विशेष प्रतिनिधी शहराच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा होत असेल, तर ती भाजपचे एकनिष्ठ आणि संघर्षशील जितेंद्र मराठे यांची. सत्ता, संधी आणि सोयीच्या राजकारणातही पक्षाशी निष्ठा जपणाऱ्या मराठेंची आजची लढाई ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता, एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाची लढाई बनली आहे.
मागील महापालिका टर्ममध्ये भाजपचे तब्बल २७ नगरसेवक पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करत असताना, अनेकांनी सत्ता आणि समीकरणांचा मार्ग स्वीकारला. मात्र त्या कठीण काळातही जितेंद्र मराठे ठामपणे भाजपसोबत उभे राहिले. पक्षासाठी निष्ठा जपली, राजकीय दबाव झुगारले. तरीही आज त्यांनाच डावलले गेले, अशी तीव्र भावना त्यांच्या समर्थकांमध्ये दिसून येत आहे.
भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर मराठे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी काही नेत्यांनी प्रयत्न केल्याची चर्चा आहे. मात्र या प्रयत्नांवर लोकशक्ती भारी पडली. त्यांच्या निवासस्थानी तब्बल एक ते दीड हजार नागरिकांनी गर्दी करून “माघार नको, मैदानात उतरा” असा ठाम आग्रह धरला. हीच जनता आज मराठेंची खरी ताकद बनली आहे.
या पार्श्वभूमीवर जितेंद्र मराठे यांनी प्रभाग क्रमांक १३ ‘ड’ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल्ल देवकर यांच्याशी होणार असून, ही लढत केवळ दोन उमेदवारांमधील नसून सत्ता विरुद्ध स्वाभिमान अशीच पाहिली जात आहे.
हेच ते जितेंद्र मराठे, ज्यांनी अवघ्या २१ वर्षांच्या तरुण वयात स्थायी समिती सभापती पद भूषवून भाजपची जिल्ह्यात आणि राज्यात मान उंचावली होती. तरुण नेतृत्व, स्वच्छ प्रतिमा आणि संघटन कौशल्य यामुळे ते आजही जनतेत लोकप्रिय आहेत. मात्र अशा नेत्याला उमेदवारी नाकारली जाणे, हा प्रश्न भाजपच्या अंतर्गत राजकारणावरही बोट ठेवणारा आहे.
आजची निवडणूक जितेंद्र मराठेंच्या राजकीय भविष्याचीच नाही, तर भाजपमध्ये एकनिष्ठ राहणाऱ्यांचे भवितव्य काय? हा प्रश्नही उपस्थित करणारी ठरणार आहे. जनता कुणाच्या बाजूने उभी राहते, हे येणाऱ्या निकालातून स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी शहराच्या राजकारणात “एकनिष्ठेसाठीची लढाई” हेच सर्वात मोठे चर्चेचे केंद्र बनले आहे.
