जळगाव महापालिकेत तिकिटांवरून रस्सीखेच; एबी फॉर्म नेमका कोणाच्या पदरात?
जनता लाईव्ह :– जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी युतीतच अंतर्गत संघर्ष उफाळून येताना दिसत आहे. नगरसेवकांची संख्या, तिकिटांचे गणित आणि एबी फॉर्मवरून सुरू असलेली रस्सीखेच आता उघडपणे चर्चेचा विषय बनली आहे.
एकीकडे शहरातील आमदार राजू मामा भोळे तसेच भाजपमधील नेते सातत्याने “मागील निवडणुकीत ५७ नगरसेवक आमचे निवडून आले होते आणि ते आजही आमचेच आहेत,” असा दावा करत होते. त्यामुळे यावेळीही किमान ५७ जागांवर भाजपची दावेदारी असल्याची चर्चा शहरात रंगली होती. मात्र प्रत्यक्षात युतीच्या जागावाटपात भाजपला केवळ ५०, शिंदे गटाच्या शिवसेनेला २५, तर राष्ट्रवादीला अवघ्या ६ जागा देण्यात आल्याचे समोर आले.
येथेच प्रश्न उपस्थित होतो जर भाजपचे ५७ नगरसेवक होते, तर ५० जागांवर समाधान कसे मानले? उरलेल्या सात जागा नेमक्या कुणासाठी?
या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी मागील नगर परिषद निवडणुकीदरम्यान केलेले आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. “वरवर साथ द्यायची आणि पडद्यामागून दुसरे उमेदवार उभे करून आतून मदत करायची,” असा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला होता. तोच पॅटर्न आता महानगरपालिकेतही वापरला जाणार का, अशी शंका इतर पक्षांकडून व्यक्त केली जात आहे.
भाजपकडील केवळ ५० अधिकृत उमेदवारांवर समाधान मानून, उरलेल्या इच्छुक उमेदवारांना अपक्ष किंवा अन्य पक्षांच्या तिकिटावर उभे करून आतून मदत केली जाईल का? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात हा प्रकार ‘अघोषित रणनीती’ म्हणून ओळखला जातो.
काल झालेल्या पत्रकार परिषदेत ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे नेते गिरीश महाजन यांनी “कोणावरही अन्याय होणार नाही,” असे आश्वासन दिले. मात्र या विधानाचा नेमका अर्थ काय, याबाबत संभ्रम कायम आहे. जर ५० जागांवर समाधान झाले असेल, तर उरलेल्या इच्छुकांचे काय? त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याचा अर्थ त्यांना पडद्यामागून संधी दिली जाणार आहे का?
एकीकडे युतीतच महानगरपालिका निवडणूक लढवली जाईल, असा अधिकृत दावा केला जात असताना, दुसरीकडे महानगरपालिकेत स्वतंत्र पक्षाच्या माध्यमातून सत्ता आणण्याचे षडयंत्र तर सुरू नाही ना? असा प्रश्नही राजकीय विश्लेषक उपस्थित करत आहेत.
एकूणच, एबी फॉर्म कोणाच्या पदरात पडणार, अधिकृत उमेदवार कोण आणि पडद्यामागील उमेदवार कोण, यावरून जळगावचे राजकारण अधिक गुंतागुंतीचे आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसत आहे. आगामी काही दिवसांत या राजकीय खेळीचा पडदा उघडणार, हे मात्र निश्चित.
