जनता लाईव्ह :– जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांनी प्रशासनाच्या उपाययोजनांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही महिन्यांपूर्वी स्मशानभूमीतून मृतदेहांचे अवशेष चोरीला गेल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने काही उपाययोजन केले असले तरी प्रत्यक्षात या उपाययोजना अपयशी ठरल्याचे वास्तव समोर आले आहे.
स्मशानभूमीच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेले तारेचे वॉल कंपाऊंडच चोरांनी उपटून नेल्याची घटना दहा ते पंधरा दिवसांपूर्वी घडल्याची माहिती आहे. ही बाब केवळ चोरीपुरती मर्यादित नसून, मृतांच्या सन्मानाचा आणि नागरिकांच्या भावनांचा अवमान करणारी असल्याची तीव्र भावना परिसरातील नागरिकांमध्ये आहे.
विशेष म्हणजे, याआधी घडलेल्या गंभीर प्रकारांनंतरही सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यात अपयश आल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी अशा घटना घडणे म्हणजे प्रशासनाची उदासीनता आणि हलगर्जीपणा दर्शवणारे आहे.
या प्रकरणी माजी नगरसेविका गायत्री उत्तम शिंदे यांनी थेट महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करत त्वरित चौकशी व संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा प्रभागातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी आता तरी डोळे उघडावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. अन्यथा स्मशानभूमीतील चोरीसारखे प्रकार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका लागणे अटळ ठरेल.
