जळगाव महापालिकेची रणधुमाळी आणि ‘निवडणूक प्रमुख’ म्हणून राजूमामा भोळेंवर भाजपचा विश्वास
जनता लाईव्ह :– जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने टाकलेलं पाऊल केवळ संघटनात्मक बदल नसून, ही एक स्पष्ट राजकीय दिशा दर्शवणारी घोषणा आहे. आमदार राजूमामा भोळे यांची भाजपच्या ‘निवडणूक प्रमुख’पदी नियुक्ती म्हणजे पक्षाने अनुभव, संपर्क आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता यावर उघडपणे शिक्कामोर्तब केल्यासारखंच आहे.
लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जळगाव शहरात भाजपने मिळवलेलं यश हे अपघाती नव्हतं, तर काटेकोर नियोजन, कार्यकर्त्यांची मोट बांधण्याची क्षमता आणि नेतृत्वावरील विश्वासाचं फलित होतं. या संपूर्ण प्रक्रियेत आमदार राजूमामा भोळे यांची भूमिका निर्णायक ठरली, हे पक्षालाही आता मान्य करावंच लागलं आहे. म्हणूनच महापालिकेसारख्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या पत्रातून ही नियुक्ती जाहीर करताना पक्षाचा हेतू स्पष्ट आहे — जळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकवायचा. नगरसेवक निवडणुकीत केवळ चिन्ह पुरेसं नसतं; प्रत्येक प्रभागातील स्थानिक समीकरणं, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि मतदारांशी थेट संवाद या बाबी महत्त्वाच्या ठरतात. याच बाबतीत राजूमामा भोळे यांचा दांडगा अनुभव आणि शहरावरील अभ्यास पक्षासाठी जमेची बाजू मानली जात आहे.
तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यामुळे त्यांचा जनसंपर्क केवळ राजकीय मर्यादेत न राहता सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवरही विस्तारलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील कामकाजाची जाण, शहरातील प्रश्नांची सखोल समज आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याची हातोटी यामुळेच ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
मात्र ही नियुक्ती जितकी सन्मानाची आहे, तितकीच ती कसोटीचीही आहे. जळगाव शहरातील नागरी प्रश्न, विकासकामांबाबतची नाराजी आणि विरोधकांची संभाव्य आक्रमक रणनीती या सगळ्यांना तोंड देत भाजपला विजयाकडे नेणं हे सोपं आव्हान नाही. ‘निवडणूक प्रमुख’ म्हणून आता राजूमामा भोळे यांना केवळ निवडणूक जिंकून देण्यापेक्षा संघटना मजबूत करण्याचं, नव्या नेतृत्वाला संधी देण्याचं आणि पक्षाची विश्वासार्हता टिकवण्याचंही आव्हान पेलावं लागणार आहे.
एकूणच, भाजपने जळगाव महापालिकेसाठी अनुभवी नेतृत्वावर विश्वास टाकत निवडणुकीची तयारी आक्रमकपणे सुरू केली आहे.
