“योजना जनतेसाठी, की सभागृहात विनोदासाठी?”
जनता लाईव्ह :– भडगाव येथील प्रचारसभेत मंत्री गिरीश महाजन यांनी बांधकाम कामगारांसाठीच्या शासकीय योजनांचा उल्लेख करत केलेले वक्तव्य आता सर्वत्र चर्चेत आहे. “हॅन्ड ग्लोज दिले, बॅटरी पेटीसह साहित्य दिले आणि मच्छरदाणी दिली काम झाल्यावर नवरा-बायको दोघे झोपा, डास चावणार नाहीत” हा वाक्यांपेक्षा उरलेलं राजकारण अधिक बोचतं.
सरकारने गरीबांसाठी योजना दिल्या याचे कौतुक असले, तरी त्या योजनांचा उल्लेख सभेत हशा पिकवण्यासाठी करायचा का? हा मूलभूत प्रश्न आहे. कारण हा विषय बांधकाम कामगारांचा म्हणजे रोज कष्टाने उपजीविका करणाऱ्या समाजघटकाचा. त्यांच्या अडचणी, सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेचे प्रश्न अजूनही तीव्र आहेत. तिथे मच्छरदाणीचा उल्लेख सभेत विनोदाच्या अंगाने करणे हे केवळ असंवेदनशीलपणाच नाही तर गरिबांच्या संघर्षाची थट्टा करण्यासारखे आहे.
महिलांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली योजना आणि सभागृहात त्यावर विनोद हा मोठा विरोधाभासच. मग सरकार योजना करतेय की विनोदाचे साहित्य पुरवतेय?
आज प्रश्न केवळ वक्तव्याचा नाही, तर विचारसरणीचा आहे. राजकारणात जनतेच्या समस्या, धोरणे आणि शासकीय मदत गांभीर्याने मांडण्याची गरज आहे. पण आजकाल राजकारणाचे स्वरूप बदलले आहे हशा, आरोळ्या आणि सोशल मीडिया क्लिप्स या गोष्टींसाठी भाषण केले जाते; कर्तव्य, संवेदनशीलता आणि उत्तरदायित्व यांना मागे टाकले जाते.
हे वक्तव्य केवळ त्रुटी नाही सरकार आणि जनतेतील अंतर किती वाढले आहे याचे जिवार्दक उदाहरण आहे महाजन यांनी योजना समजावून सांगितली की बांधकाम कामगारांच्या आयुष्याची थट्टा केली?
