जनता लाईव्ह :– निवडणुकीची धांदल आणि ‘सतरंजी कार्यकर्त्यां’वरचा राजकीय दबाव
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आज फॉर्म मागे घेण्याचा शेवटचा दिवस. उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेपेक्षा अधिक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे नाराज कार्यकर्त्यांवर निर्माण होत असलेला राजकीय दबाव. निवडणूक लागली की प्रत्येक नेत्याच्या सभेला धाव घेणारे, तंबू उभारणारे, खुर्च्या मांडणारे आणि झेंडे घेऊन रॅलीत चालणारे हेच कार्यकर्ते आज राजकारणी लोकांच्या नजरेत ‘सर्वाधिक महत्त्वाचे’ झाले आहेत.
राजकीय समीकरणे बदलण्याची ताकद या कार्यकर्त्यांकडेच असल्यानं आजचा दिवस त्यांच्या भोवतीच फिरताना दिसतो. सकाळपासून नेतेमंडळी आणि त्यांचे विश्वासू लोक या कार्यकर्त्यांना गाठून त्यांच्यावर मनधरणीची मोहीम राबवत आहेत. भाऊंनी शब्द दिला आहे ऐकून घे, समजून घे, नंतर बघू आपण आत्ता जरा थांब,अशी वाक्ये आज दिवसभर राजकीय कार्यालयांमध्ये, घरांमध्ये आणि गल्लीबोळात ऐकू येतील.
गेल्या काही दिवसांपासून जी नाराजी उफाळून आली होती, तिचा निवडणुकीच्या निकालावर गंभीर परिणाम होऊ शकतो, हे नेत्यांना चांगलं कळतंय. त्यामुळेच आज साम, दाम, दंड, भेद या राजकीय शस्त्रांचा खुलेआम वापर होतो आहे. काहींना गोड बोलून पाठीशी बांधण्याचा प्रयत्न, काहींना आश्वासनांचा गोडवा, काहींना दबावाचं औषध आणि काहींच्या गटात फूट पाडून जुळवजुळव ही चारही साधनं आज प्रत्यक्ष राबवली जात आहेत.
या राजकीय नाट्याचा खरा केंद्रबिंदू म्हणजे तोच ‘सतरंजी कार्यकर्ता’. सभांना गर्दी जमवणारा, पोस्टर लावणारा, स्टेज तयार करणारा, झेंडे उचलणारा हा कार्यकर्ता निवडणुकीच्या दिवशी अचानक महत्त्वाचा बनतो, तर निवडणूक संपली की पुन्हा एकदा त्याच्यावर विस्मृतीची धूळ बसते. पण आज मात्र त्याच्या दिशेने साऱ्या नजरा वळल्या आहेत, कारण त्याच्या एका निर्णयानं स्थानिक राजकारणाचं संपूर्ण गणित ढवळून निघू शकतं.
फॉर्म मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वातावरणात प्रचंड गडबड दिसून येणार. कोण उमेदवार राहणार, कोण मागे घेणार, कोण कुणाच्या बाजूला उभा राहणार यावर आज दिवसभर चर्चा रंगनार. ‘भाऊंनी सांगितलं’ ‘दादांनी सूचित केलं’ ‘वरून आदेश आलाय’ अशा असंख्य वाक्यांनी पक्ष कार्यालये आणि गटांतील चर्चा गजबजून जातील.
संपादकीय दृष्टीने पाहता, ही परिस्थिती स्थानिक राजकारणातील खोलवर रुजलेली विसंगती उघड करते. निवडणुकीच्या काळात सर्वसामान्य कार्यकर्ता महत्त्वाचा समजला जातो, परंतु निकाल जाहीर होताच त्याची किंमत पुन्हा शून्य होते. राजकीय गलबल्यात त्याच्या नाराजीचा वापर केला जातो, पण त्याच्या अस्तित्वाचा आदर क्वचितच केला जातो.
आज दिवस संपता-संपता कोणता कार्यकर्ता दबावाला झुकतो आणि कोण ठाम राहतो,यावरच अनेक जागांचा निकाल ठरण्याची चिन्हं स्पष्टपणे दिसत आहेत.
