जनता लाईव्ह:–जळगाव जिल्ह्यात भाजपने घराणेशाहीविरोधी भूमिका मांडत स्वतःला वेगळं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्ष निवडणूक समीकरणात मात्र याच पक्षातील मंत्री आणि आमदारांनी आपल्या पत्नींना उमेदवारी देऊन घराणेशाहीचं उघड प्रदर्शन केल्याची टीका होत आहे.
जिल्ह्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यांची वर्षानुवर्षांची निष्ठा, मेहनत आणि संघटनातील योगदान बाजूला सारून घरातील व्यक्तींना वरचढ स्थान देण्याची ही प्रवृत्ती वाढत चालली असून, यामुळे पक्षातील नाराजी तीव्र झाली आहे. बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर माजी खासदार उन्मेश पाटील यांनी या मुद्द्यावर जोरदार टीका केली. भाजप ही “गांडूळाची औलाद” बनली असल्याचे कठोर शब्दात भाष्य करत, त्यांनी मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण आणि मंत्री संजय सावकारे यांच्यावर थेट निशाणा साधला.
उन्मेश पाटील यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर हल्ला चढवताना असे म्हटले की, घराणेशाहीविरोधातील भूमिका ही फक्त भाषणापुरतीच उरली आहे; प्रत्यक्षात पक्ष नेतेच घरातील व्यक्तींना तिकीट देत आहेत आणि त्यात सर्वांत जास्त भरडला जात आहे तो प्रामाणिक व तळागाळातील कार्यकर्ता. कार्यकर्त्यांच्या निष्ठेला दुर्लक्षित करून सत्तेच्या जवळ असलेल्या काही निवडक नेत्यांनी स्वतःचे कुटुंब राजकारणात पुढे आणण्याचा प्रयत्न केल्याने पक्षाच्या तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील राजकारणात या घटनांमुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत आहे. भाजपने घराणेशाहीविरोधी ध्वज घेतला असला तरी, प्रत्यक्ष वर्तनाने हा दावा आता टिकाऊ राहिलेला नाही, असा सूर उन्मेश पाटील यांच्या टीकेतून स्पष्टपणे दिसून आला.
