जनता लाईव्ह :– समाजात मातब्बर म्हटले की अनेक दशके आपण फक्त राजकीय व्यक्तींनाच त्या पदवीने गौरवले. वारंवार निवडून येणारे, पैशाची ताकद असलेले, निवडणुका जिंकण्याची कौशल्ये असलेले नेते हेच राजकीय मातब्बर. पण या शब्दाच्या आतलं आशय आपण अनेक वर्षे राजकीय चौकटीतच कैद करून ठेवला. प्रत्यक्षात समाजात इतकी माणसं आहेत जी कोणत्याही पदाविना, कोणत्याही राजकीय ओळखीविना सतत लोकांच्या प्रश्नांवर काम करत असतात. त्यांच्यासाठी अद्याप कोणताही औपचारिक उल्लेख नव्हता आणि म्हणूनच “सामाजिक मातब्बर” हा शब्दप्रयोग आता नव्याने आणि जाणीवपूर्वक वापरण्याची वेळ आली आहे.
माध्यमांत, राजकारणात किंवा सार्वजनिक चर्चेमध्ये हा शब्द आढळत नाही. कारण या लोकांनी प्रसिद्धीसाठी नव्हे, तर समाजासाठी आयुष्य घातले. जे सतत लोकांच्या अडचणीत धावत जातात, आंदोलने करतात, न्याय, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण अशासारख्या मूलभूत प्रश्नांवर सातत्याने लढतात. ते कोणत्याही पदाच्या आधारावर नाही, तर कामाच्या गुणावर पुढे गेलेले असतात. त्यांना समाज तोंडात घास देत नाही, पण आदर मोठ्या मनाने देतो. हेच लोक आता सामाजिक मातब्बर म्हणून ओळखले जावेत, आणि त्यांचा हा सन्मान समाजाने तसेच माध्यमांनीही नोंदवावा.
याउलट, राजकीय मातब्बरांचे चित्र अगदी वेगळे आहे. निवडणुका जिंकण्याचे तंत्र, पैसा, प्रलोभने, शक्तीबाजी, गटबाजी या ताकदींचा वापर करून ते सत्ता मिळवतात आणि टिकवतात. कोणतेही आंदोलन नाही, सामाजिक प्रश्नांवर संघर्ष नाही. पण निवडणुका मात्र धडाधड जिंकतात. निवडून आल्यानंतर विशिष्ट प्रकारचे कामांचे ठेके, राजकीय दबावातून मिळणारे आर्थिक व्यवहार आणि मग पुन्हा त्या पैशाच्या आधारावर पुढच्या निवडणुका हे एक ठरलेले चक्र बनले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत समाजाच्या मूलभूत गरजा रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज, स्वच्छता या मागे पडतात, आणि मतदार मात्र त्यांच्यासाठी पाच वर्षे मारामार करतो.
पण या साऱ्या काळात जो सामाजिक मातब्बर असतो तो कधीच मागे हटत नाही. त्याला सत्ता नसते, पैसा नसतो, पद नसते पण त्याच्याकडे लोकांचा विश्वास असतो. तो कोणाच्याही दबावाखाली येत नाही, ना कोणापुढे झुकतो. कारण त्याचे काम हे कंत्राटासाठी नसते, तर समाजासाठी असते. तो लोकांसाठी अडथळे काढतो, समस्यांवर उपाय शोधतो, शासनाच्या दारात न थकता उभा राहतो. अशा प्रकारचे लोक जर विशिष्ट सभागृहात पालिका, पंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा येऊन बसले तर ते समाजासाठी कोणता बदल करू शकतात याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. कारण ते खऱ्या अर्थाने समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
आजचा सर्वात मोठा प्रश्न असा आहे. आपण मतदान करताना नेमके कोणाला निवडतो? आर्थिक प्रलोभन देणाऱ्या आणि पाच वर्षांनी गायब होणाऱ्या राजकीय मातब्बरांना ? की वर्षानुवर्षे आपल्या परिसरासाठी प्रामाणिकपणे झटणाऱ्या सामाजिक मातब्बरांना?
मतदारांनी या क्षणी आपला विचार बदलला नाही तर विकास, पारदर्शकता आणि सामाजिक न्याय हे शब्द फक्त आश्वासनांमधूनच फिरत राहतील. पण जर आपण या नव्या ‘सामाजिक मातब्बरांना’ संधी दिली, तर सभागृहात खरे सामाजिक परिवर्तन होईल. कारण त्यांच्याकडे धडपड आहे, जिद्द आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजासाठी स्वार्थरहित हृदय आहे.
म्हणून मतदार बंधूंनो विचार करा, समजा आणि ठरवा खरा मातब्बर कोण..? पैशाने मतांची मापं ठरवणारा नेता.? की समाजासाठी प्राणपणाने लढणारा कार्यकर्ता..?
आजच्या काळात ही निवडच समाजाचा भविष्यकाल ठरवणार आहे.
