चार गाड्या जप्त, पण दवाखान्याबाहेर ‘चहाचा व नाश्त्याचा ठेका काही स्वरूपी दिल्याची परिस्थिती’ प्रशासनावर नागरिकांचा रोष..
प्रतिनिधी | जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते आरटीओ कार्यालय या महत्त्वाच्या मार्गावर सोमवारी मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाने हटाव मोहीम राबवली. या मोहिमेत रस्त्यावर बेकायदेशीररीत्या उभ्या असलेल्या चार खाद्यपदार्थांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या.
या हातगाड्यांमुळे मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत होती. पथकाने ही कारवाई केल्यानंतर उर्वरित अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण हटवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.
मात्र, आकाशवाणी चौक ते महाबळ रस्ता या भागात मात्र प्रशासनाची भूमिका दुहेरी असल्याची चर्चा नागरिकांत आहे. अतिक्रमण धारकाना केवळ चेतावणी देऊन सोडण्यात येते, तर इतरांवर कठोर कारवाई केली जाते, असा आरोप परिसरातील व्यावसायिकांनी केला आहे.
विशेष म्हणजे, पशुवैद्यकीय दवाखान्याबाहेरील अतिक्रमण अजूनही जैसे थे आहे. मिसळ गाड्या, चहाच्या टपऱ्या आणि पोह्यांच्या हातगाड्यांमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. ग्राहक वाहन रस्त्याच्या मधोमध उभी करतात आणि त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोय भोगावी लागते.
महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात माजी नगरसेवकांनी पंधरादिवसांपूर्वी तक्रार केली असतानाही, प्रत्यक्षात फक्त दिखाऊ कारवाई झाल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे. दवाखान्याबाहेरील परिस्थिती आजही जसच्या तस असल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
